कोल्हापूर : प्रत्यक्ष कराच्या जमेचे 86.68 टक्के उद्दिष्ट पूर्ण! | पुढारी

कोल्हापूर : प्रत्यक्ष कराच्या जमेचे 86.68 टक्के उद्दिष्ट पूर्ण!

कोल्हापूर, राजेंद्र जोशी : व्यक्तिगत करदात्यांनी कर भरण्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे देशाच्या तिजोरीत 10 जानेवारीअखेर प्रत्यक्ष कराच्या गंगाजळीत 14 लाख 71 हजार कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत कराचे परतावे वजा जाता प्रत्यक्ष कराची ही वाढ 19.55 टक्के इतकी असून, भारत सरकारने 2022-23 च्या अर्थसंकल्पामध्ये निर्धारित केलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत 86.68 टक्क्यांचा कर जमा झाला आहे.

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने याविषयी एक परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. यामध्ये परताव्याशिवाय प्रत्यक्ष कराच्या रकमेमध्ये 24.58 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. यामध्ये व्यक्तिगत करदात्यांच्या कर भरण्याच्या रकमेत सर्वाधिक 30.46 टक्क्यांची वाढ नोंदविली गेली आहे, तर कॅार्पोरेट क्षेत्रातील आयकरात ही वाढ 19.72 टक्के इतकी आहे. केंद्र सरकारने गतवर्षीच्या अर्थसंकल्पात प्रत्यक्ष करासाठी 14 लाख कोटींचे उद्दिष्ट निर्धारित केले होते.

2021 -22 मधील उद्दिष्टाच्या (12.31 हजार कोटी) तुलनेत ही रक्कम 1 लाख 69 हजार कोटी रुपयांहून अधिक होती. चालू आर्थिक वर्षात 1 एप्रिल ते 10 जानेवारीअखेर प्रत्यक्ष कराच्या गंगाजळीत 14.71 लाख कोटी रुपये जमा झाले, तर याच कालावधीत 2 कोटी 40 लाख रुपयांचे आयकराचे परतावे (रिफंडस्) करदात्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. ही परताव्याची रक्कम वजा जाता सरकारी तिजोरीत प्रत्यक्ष कराचे निव्वळ 12.31 लाख कोटी रुपये जमा झाले आहेत.

Back to top button