रुपे, भीम अ‍ॅप व्यवहारांना चालना; केंद्राची 2,600 कोटींची तरतूद | पुढारी

रुपे, भीम अ‍ॅप व्यवहारांना चालना; केंद्राची 2,600 कोटींची तरतूद

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा :  रुपे डेबिट कार्ड आणि भीम अ‍ॅपवरून होणार्‍या छोट्या व्यवहारांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत रुपे डेबिट कार्ड आणि भीप अ‍ॅपला चालना मिळावी, यासाठी 2,600 कोटींची तरतूद केली आहे. या निर्णयानुसार, 2022-23 या आर्थिक वर्षासाठी रुपे डेबिट कार्ड आणि भीम अ‍ॅप वापरणार्‍यांना परतावा मिळणार आहे. अर्थात, ‘टू पर्सन, टू मर्चंट’ या तत्त्वावर देण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अर्थिक व्यवहाराबद्दल हा मोठा निर्णय घेण्यात आला.
केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी पत्रकार परिषदेत निर्णयाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, केंद्र सरकारने रुपे डेबिट कार्ड आणि भीम अ‍ॅप वापरणार्‍यांसाठी 2,600 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे एमएसएमई, शेतकरी, मजूर आणि छोट्या उद्योगपतींना यूपीआय पेमेंटमधून केल्या जाणार्‍या छोट्या व्यवहारांवर सूट मिळणार आहे. या निर्णयानुसार, रुपे कार्डद्वारे होणार्‍या व्यवहारांवर 0.4 टक्का, भीम यूपीआयद्वारे 2,000 रुपयांपेक्षा कमीच्या व्यावहारांवर 0.25 टक्का आणि भीम यूपीआयद्वारे इंडस्ट्रीसाठी होणार्‍या डिजिटल व्यवहारावर 0.15 टक्का परतावा मिळणार आहे.

Back to top button