भागलपूर, वृत्तसंस्था : चार वर्षांपूर्वी स्वतःच्या विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या शिक्षकाने केसच बंद व्हावी आणि शिक्षेतून सुटका व्हावी म्हणून स्वतःला मृत घोषित केले होते. त्यासाठी स्वत:ची चिता रचली होती. त्याची छायाचित्रे काढून पित्याकरवी ती पॉक्सो न्यायालयासमोर सादर केली आणि खटला बंद करण्यात यश मिळविले. पण अखेर कायद्याचे हात त्याच्या कॉलरपर्यंत पोहोचलेच आणि त्याला न्यायालयाने १४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.
चार वर्षांपूर्वी बलात्काराची ही घटना घडली होती. कारवाईतून बचावासाठी नीरज मोदी हा प्रेत बनला होता. पॉक्सो विशेष न्यायाधीश लवकुश कुमार यांनी त्याबद्दल नीरजला एक लाख रुपये दंडही ठोठावला आहे. दंड न भरल्यास चार वर्षांपूर्वी बलात्काराची ही त्याला ६ महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल. पीडित विद्यार्थिनीला ३ लाख रुपये भरपाईही या निकालानुसार मिळणार आहे.
मधुरा सिमानपूर गावातील शिक्षक नीरज मोदी याच्याविरुद्ध विद्यार्थिनीच्या आईने १४ ऑक्टोबर २०१८ रोजी गुन्हा दाखल केला होता. नीरजने स्वतः च्या मृत्यूची खोटी गोष्ट रचली. अंत्यसंस्काराचे नाट्य उभे केले. मृत्यूचे खोटे प्रमाणपत्रही मिळविले. यानंतर तो भूमिगत झाला. कोर्टाने पोलिसांनी त्याच्या मृत्यूवर विश्वास ठेवून त्याच्याविरुद्धचे प्रकरणच बंद केले.
पीडित विद्यार्थिनीच्या आईला नीरज जिवंत असल्याची तसेच त्याचा मृत्यू हे नाटक असल्याची कुणकुण लागली आणि तिने गटविकास अधिकाऱ्यांकडे बनावट मृत्यू प्रमाणपत्र प्रकरणी तक्रार नोंदविली. गटविकास अधिकाऱ्यांनी नीरजच्या पित्यावर (राजाराम) गुन्हा दाखल केला. पित्याच्या अटकेनंतर नीरज न्यायालयासमोर स्वतःच शरण आला होता