Snake In Mid-Day Meal : मध्यान्ह भोजनात सापडला साप, विषारी अन्न खाल्ल्याने 16 मुलांची प्रकृती चिंताजनक | पुढारी

Snake In Mid-Day Meal : मध्यान्ह भोजनात सापडला साप, विषारी अन्न खाल्ल्याने 16 मुलांची प्रकृती चिंताजनक

पुढारी ऑनलाईन डेस्क : Snake In Mid-Day Meal : बीरभूम जिल्ह्यातील मयुरेश्वर पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या मंडलपूर प्राथमिक शाळेत सोमवारी मध्यान्ह भोजनात मृत साप आढळल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, विषयुक्त अन्न खाल्ल्याने सुमारे वीस विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली असून त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर मुलांना रामपूरहाट मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच मुलांचे पालक व ग्रामस्थ शाळेच्या आवारात पोहोचले आणि एकच गोंधळ उडाला. जमावाने मुख्याध्यापकांची दुचाकी आणि शाळेतील टेबल-खुर्चीची तोडफोड केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यातील शाळांमध्ये माध्यान्ह भोजनाच्या वेळी मुलांना चिकन दिले जावे, अशी घोषणा केल्यानंतर काही दिवसांतच ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

वरणाच्या बादलीत मृत साप आढळला

स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले की, रोजच्याप्रमाणेच दुपारचे जेवण तयार करण्यात आले. त्यानंतर मध्यान्ह भोजन देताना डाळीच्या बादलीत मृत साप आढळून आला. ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण शाळेच्या परिसरात एकच खळबळ उडाली. सुमारे 15 ते 20 जणांनी मध्यान्ह भोजन खाल्ले होते. काही मुलांना विषबाधा झाल्याने त्यांना उलटी होऊ लागली. शाळेतील स्टाफने तातडीने मुलांना रुग्णालयात दाखल केले.

सर्व मुले सुरक्षित

उपचार करणा-या डॉक्टरांनी घाबरण्याची गरज नसल्याचे सांगितले आहे. सर्व मुले सुरक्षित असून मुलांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, शाळेच्या आवारात माध्यान्ह भोजन बनवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत गोंधळ आणि तोडफोड केली. शाळेत स्वच्छ पद्धतीने माध्यान्ह भोजन तयार केले जात नसल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ आणि पालकांनी केला आहे. शिक्षकांसह माध्यान्ह भोजन कर्मचारीही याकडे लक्ष देत नाहीत. आज एवढी मोठी घटना घडली आहे की वरणामध्ये मृत साप सापडला आहे, असे म्हणून भाजपच्या स्थानिक नेत्यांनी या घटनेचा निषेध केला आहे.

Back to top button