अनिवासी भारतीय हे राष्ट्रदूतच : पंतप्रधान मोदी

file photo
file photo

इंदूर; वृत्तसंस्था :  अनिवासी भारतीय हे जगात भारताचे राष्ट्रदूत आहेत. त्यांनी भारताचा योग, आयुर्वेद, हस्तकला आदींचे ब्रँड अ‍ॅम्बेसॅडर बनावे आणि उज्ज्वल भारताचे चित्र जगासमोर मांडावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले. इंदौर येथे प्रवासी भारतीय संमेलनात ते बोलत होते.

सोमवारी 17 वा प्रवासी भारतीय दिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्त मध्य प्रदेशात इंदौर येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी जगभर पसरलेल्या भारतीय समुदायाचे प्रतिनिधी आवर्जून हजर होते. त्यांना उद्देशून पंतप्रधान मोदी म्हणाले की, जगाच्या विविध देशांत राहणारे भारतीय हे देशाचे प्रतिनिधित्व करतात. ते एका अर्थाने राष्ट्रदूत आहेत. भारताचा गौरव असलेल्या आयुर्वेद आणि योग शास्त्राचे ते ब्रँड अ‍ॅम्बेसॅडर आहेत. भारतातील कुटिरोद्योग आणि संपन्न हस्तकलांचे ब्रँड अ‍ॅम्बेसॅडर आहेत. त्याच वेळी आता त्यांनी भारतातील तृणधान्यांचेही ब्रँड अ‍ॅम्बेसॅडर बनून त्याचा देशोदेशी प्रसार करावा.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताचा हा अमृतकाळ आहे. भारताच्या या प्रवासात अनिवासी भारतीयांचे स्थान मोठे आहे. आज जग भारताकडे उत्सुकतेने आणि आशेने बघत आहे. भारताचे म्हणणे गांभीर्याने ऐकून घेतले जाते. भारताची ही वाढलेली ताकद आगामी काळात आणखी वाढणार आहे. भारत आता जी-20 संघटनेचा यजमान देश आहे. जी-20 च्या बैठका हा फक्त राजनैतिक इव्हेंट न राहता तो लोकसहभागाचा इव्हेंट करायचा आहे. भारताच्या युवा ताकदीचा गौरवपूर्ण उल्लेख करीत पंतप्रधान मोदी म्हणाले की, सक्षम आणि कर्तबगार युवकांची भारतात मोठी संख्या आहे. आपल्या देशातील तरुणांकडे कौशल्य आहे, मूल्ये आहेत, तसेच झेप घेण्याची जिद्द आणि प्रामाणिकपणा आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news