नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : वर्षाच्या सुरुवातीलाच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात असून, शिंदे गटाला यापूर्वी शिवसेनेच्या वाट्यातील दोन मंत्रिपदे दिली जाऊ शकतात. त्यामुळे मंत्रिमंडळात शिंदे गटाच्या कुठल्या खासदाराची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जानेवारी महिन्याच्या अखेरीस नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात फेरबदलासह विस्ताराची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यात भाजपला सत्तास्थापन करण्यासाठी मदत करणाऱ्या शिंदे गटाला मंत्रिमंडळ विस्तारात जागा मिळण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबरोबरच भारतीय जनता पक्षात संघटनात्मक फेरबदल होण्याची शक्यता आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारमध्ये हा अंतिम फेरबदल जानेवारी अखेरीपर्यंत कधीही होऊ शकतो.
महाराष्ट्रात शिवसेनेला खिंडार पाडून महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवरून खाली खेचण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजप पक्षश्रेष्ठींनी जी आश्वासने दिली होती त्यात केंद्रातील दोन मंत्रिपदांचाही समावेश होता, असे सांगितले जाते. शिवसेना महाराष्ट्रात सत्तेत असतानाच केंद्रीय मंत्रिमंडळातून आणि भाजपच्या आघाडीतूनही बाहेर पडली होती. तेव्हापासून शिवसेनेच्या वाट्याची दोन मंत्रिपदे रिक्तच आहेत. या दोन पदांसाठी शिवसेनेतील बंडखोरी उफाळून येण्याच्या आधीपासून भाजपच्या जवळ गेलेले शिंदे गटाचे लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळे यांचे नाव आघाडीवर असल्याचे मानले जाते. मात्र, त्यांच्याबद्दल महिलेच्या तक्रारीवरून सुरू असलेला वाद आडवा येऊ शकतो. भावना गवळी यांचीही संधी ईडी प्रकरणामुळे जाऊ शकते.