थंडीच्या कडाक्यात आणखी वाढ, दिल्लीचे तापमान दोन अंश से. पर्यंत खाली घसरले | पुढारी

थंडीच्या कडाक्यात आणखी वाढ, दिल्लीचे तापमान दोन अंश से. पर्यंत खाली घसरले

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : उत्तर भारतातील थंडीचा कडाका आणखी वाढला असून देशाची राजधानी दिल्लीतील तापमान दोन अंश सेलि्सयसपर्यंत खाली घसरले आहे. दिल्लीतील आयानगर येथे तर तापमान १.८ अंश सेल्सियस इतके नोंदविले गेले. दुसरीकडे रिज येथे ३.३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. दरम्यान दाट धुक्यामुळे रेल्वेला २६८ गाड्या रद्द कराव्या लागल्या. याशिवाय असंख्य गाड्या उशिराने धावत आहेत.

येत्या रविवारपर्यंत थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता असून त्यानंतर पुढील पाच दिवस लोकांना दिलासा मिळेल, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. दिल्लीतील दृष्यता काही प्रमाणात सुधारली असली तरी हवा मात्र खराब आहे. शनिवारी देखील किमान तापमान चार अंश सेल्सियसच्या खाली राहण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने काही भागासाठी ऑरेंज तर काही भागासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. हिमाचल प्रदेशातील सिमला, डलहौसी तसेच कांगडा येथे तापमान तीन अंशाच्या खाली गेले आहे. दुसरीकडे पंजाबमध्ये पुढील काही दिवस थंडीचा कडाका राहण्याचा अंदाज आहे.

थंडी आणि धुक्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरही झाला आहे. रेल्वेकडून शुक्रवारी २६८ गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या होत्या. ४७ गाड्या ठराविक ठिकाणांपर्यंत चालविण्यात आल्या तर १९ गाड्या अन्य मार्गाने वळविण्यात आल्या. याशिवाय १८ गाड्यांची वेळ बदलण्यात आली होती. उशीराने धावत असलेल्या गाड्यांत दिब्रुगड राजधानी, बंगळुरु राजधानी, मुंबई राजधानी एक्सप्रेस आदी गाड्यांचा समावेश होता. धुक्याचा परिणाम हवाई वाहतुकीवरही झाला असून ६० विमानांचे आगमन आणि प्रस्थान लांबल्याचे विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा :

Back to top button