पूजा सिंघल यांना दिलासा : सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर | पुढारी

पूजा सिंघल यांना दिलासा : सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : भ्रष्टाचार आणि हवालाचा गंभीर आरोप झालेल्या झारखंडच्या निलंबित आयएएस अधिकारी पूजा सिंघल यांना सर्वोच्च न्यायालयाने एका महिन्यासाठी अंतरिम जामीन दिला आहे. मुलगी आजारी असल्याने तिच्या देखभालीसाठी जामीन दिला जावा, अशी विनंती सिंघल यांनी केली होती. जामिनावर असताना दिल्लीमध्येच रहावे, झारखंडला जाऊ नये, असे निर्देशही न्यायमूर्ती संजय कौल आणि न्यायमूर्ती अभय ओक यांच्या खंडपीठाने दिले आहेत.

झारखंड उच्च न्यायालयाने पूजा सिंघल यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर सिंघल यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. डिसेंबर महिन्यात दाखल झालेल्या या याचिकेवर मंगळवारी (दि.३) सुनावणी झाली आणि न्यायालयाने सिंघल यांना तात्पुरता दिलासा दिला. मनरेगा घोटाळा तसेच हवाला प्रकरणाच्या अनुषंगाने सक्तवसुली संचलनालयाने 6 मे 2022 रोजी सिंघल यांच्या ठिकाणांवर छापेमारी केली होती. त्यावेळी 19 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम सापडली होती. छापेमारीनंतर सिंघल, त्यांचे पती अभिषेक झा तसेच सीए सुमन कुमार यांना ताब्यात घेण्यात आले होते. चौकशीअंती पूजा सिंघल यांना 11 मे 2022 रोजी अटक करण्यात आली होती.

हेही वाचलंत का ? 

Back to top button