Import Duty On Gold : दागिने निर्यातीला चालना मिळण्यासाठी सोन्यावरील आयात कर कमी करा : व्यापार मंत्रालय

Gold
Gold

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : दागिने निर्यातीला चालना मिळावी, याकरिता आगामी अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात कर (Import Duty On Gold) कमी करावा, अशी विनंती व्यापार मंत्रालयाने अर्थ मंत्रालयाकडे केली आहे. गेल्या जुलै महिन्यात केंद्र सरकारने सोन्यावरील आयात कर 10.75 टक्क्यांवरुन 15 टक्क्यांपर्यंत वाढविला होता. चालू वित्तीय तूट कमी करण्याच्या उद्देशाने त्यावेळी सोन्याच्या आयात करात वाढ करण्यात आली होती.

सोन्यावरील मूळ आयात कर 12.5 टक्के (Import Duty On Gold) इतका आहे. तर कृषी पायाभूत विकास उपकरापोटी अडीच टक्के कर आकारला जातो. थोडक्यात सोन्याच्या आयातीवर सध्या एकूण 15 टक्के इतका कर आहे. जेम्स आणि ज्वेलरी क्षेत्राला चालना मिळण्याबरोबरच दागिन्यांची निर्यात वाढावी, याकरिता आयात कर कमी केला जावा, असे व्यापार मंत्रालयाने अर्थ मंत्रालयाला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, आगामी अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात कर कमी केला जाईल, अशी अपेक्षा जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलचे माजी अध्यक्ष कोलिन शहा यांनी व्यक्त केली आहे. करात कपात झाली तर हिरे आणि दागिन्यांच्या निर्यातीत 300 ते 400 दशलक्ष डॉलर्सने वाढ होऊ शकते, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गत एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांच्या कालावधीत हिरे आणि दागिन्यांच्या निर्यातीत दोन टक्क्यांनी वाढ होऊन निर्यात 26.45 अब्ज डॉलर्सवर पोहोचली होती. तर दुसरीकडे याच कालावधीत सोन्याची आयात 18.13 टक्क्याने कमी होऊन 27.21 अब्ज डॉलर्सवर आली होती.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news