आता घरापासून दूर राहणार्‍या मतदारांनाही मतदान करणे शक्य | पुढारी

आता घरापासून दूर राहणार्‍या मतदारांनाही मतदान करणे शक्य

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : घरापासून दूर राहणार्‍या मतदारांसाठी निवडणूक आयोगाने रिमोट व्होटिंग सिस्टीम आरव्हीएम प्रणाली तयार केली असून आयोगाने गुरुवारी ही घोषणा केली आहे.

घरापासून दूर दुसर्‍या शहरात आणि राज्यात राहणारा मतदार आता रिमोट इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन म्हणजेच आरव्हीएमच्या मदतीने निवडणुकीत मतदान करू शकणार आहेत. मतदानासाठी त्याला घरी यावे लागणार नाही. यासंदर्भात निवडणूक आयोग 16 जानेवारी रोजी सर्व राजकीय पक्षांना याविषयीचे प्रात्यक्षिक दाखविणार आहे.

अन्य राज्यात काम करणारे लोक, स्थलांतरित मजूर या नव्या प्रणालीद्वारे मतदान करू शकतात. याचा अर्थ ते घरी बसून मतदान करतील असे नव्हे. आयोगाने उपलब्ध केलेल्या या सुविधेचा लाभ घेण्यासाठी त्यांना रिमोट व्होटिंगच्या ठिकाणी पोहोचावे लागेल. एका अंदाजानुसार, देशामध्ये आपली घरे आणि शहरे सोडून अन्य राज्यांत राहणार्‍यांची संख्या सुमारे 45 कोटी आहे. दरम्यान, ही प्रणाली पूर्णपणे निर्दोष आणि सुरक्षित असल्याची हमी मिळायला हवी. नंतरच त्यावर विचार करता येईल, अशी प्रातिनिधिक प्रतिक्रिया जदयूने व्यक्त केली आहे.

16 जानेवारीला प्रात्यक्षिक

निवडणूक आयोगाने 16 जानेवारीला सर्व राजकीय पक्षांना बोलावले आहे. ही आरव्हीएम यंत्रणा यावेळी राजकीय पक्षांना दाखवली जाणार आहे. यानंतर आयोग सूचना मागवणार आहे. त्यामुळे अंमलबजावणीची प्रक्रिया पुढे जाईल. जम्मू-काश्मीरखेरीज 2023 मध्ये देशातील नऊ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुकाही होणार आहेत. आरव्हीएम प्रणालीची अंमलबजावणी प्रामुख्याने राजकीय पक्ष आणि निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या लोकांच्या मतावर अवलंबून असणार आहे.

Back to top button