RT-PCR Test : सहा देशांतून येणाऱ्या नागरिकांसाठी ‘आरटी-पीसीआर’ सक्तीची : केंद्रीय आरोग्य मंत्री मांडवियांची माहिती | पुढारी

RT-PCR Test : सहा देशांतून येणाऱ्या नागरिकांसाठी 'आरटी-पीसीआर' सक्तीची : केंद्रीय आरोग्य मंत्री मांडवियांची माहिती

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा – चीनसह सहा देशांतून येणाऱ्या नागरिकांसाठी आरटी-पीसीआर चाचणी सक्तीची करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडाविया यांनी गुरुवारी सोशल मीडीयाच्या माध्यमातून दिली. ( RT-PCR Test )  ज्या देशांतून येणाऱ्या नागरिकांसाठी ही चाचणी सक्तीची करण्यात आली आहे, त्यात चीन, हाॅंगकाॅंग, जपान, द. कोरिया, सिंगापूर आणि थायलंड यांचा समावेश आहे.  येत्या एक तारखेपासून वरील ठिकाणांहून येणाऱ्या नागरिकांसाठी आरटी पीसीआर चाचणी सक्तीची राहील.

RT-PCR Test :  दोन दिवसांत सहा हजार जणांची चाचणी

प्रवाशांना त्या देशांतून निघण्यापूर्वी एअर सुविधा पोर्टलवर आरटी – पीसीआर चाचणीचा अहवाल अपलोड करावा लागेल. विदेशातून गेल्या दोन दिवसांत आलेल्या सहा हजार लोकांची चाचणी घेण्यात आली होती, त्यातील 39 लोकांना कोरोना झाल्याचे दिसून आले आहे.

चीनसह जगाच्या अनेक भागात कोरोना वेगाने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी पुढील चाळीस दिवस अतिशय महत्वपूर्ण राहणार असल्याचे अलिकडेच आरोग्य मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले होते. जानेवारीच्या मध्यापासून देशात कोरोना वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशाराही आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे. याआधीचा अनुभव लक्षात घेतला तर पूर्व आशियात कोरोनाचे आगमन झाल्यानंतर भारतात ३० ते ३५ दिवसांनी कोरोनाचा विस्फोट झाला होता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर विशेष नजर ठेवली जात आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button