आयसीआयसीआय बँक घोटाळ्यातील राजकीय हितसंबंध उघड होतील : सुब्रह्मण्यम स्वामी | पुढारी

आयसीआयसीआय बँक घोटाळ्यातील राजकीय हितसंबंध उघड होतील : सुब्रह्मण्यम स्वामी

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  काही बड्या राजकीय नेत्यांना आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठीच आयसीआयसीआय बँक कर्ज घोटाळा चंदा कोचर व दीपक कोचर यांनी केल्याचा खळबळजनक आरोप भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी बुधवारी केला.

आयसीआयसीआय बँकेने बँकिंग नियमांचे उल्लंघन करून व्हिडिओकॉन ग्रुप ऑफ कंपनीला 3 हजार 250 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केल्याच्या आरोपाखाली बँकेच्या माजी एमडी आणि सीईओ चंदा कोचर व त्यांचे पती दीपक कोचर यांना सीबीआयने अटक केली आहे. अशात स्वामी यांनी केलेल्या या दाव्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. यामुळे लवकरच या घोटाळ्यातील राजकीय संबंध देखील पुढे येण्याची शक्यता आहे. याबाबतचे वृत्त एका वृत्त वाहिनीने दिले आहे.

चंदा कोचर यांनी गुन्हा केला आहे आणि कोणाला तरी खूश करण्यासाठीच केला असल्याचा दावा करत सुब्रह्मण्यम स्वामी म्हणाले, मला त्या राजकारण्याचे नाव माहीत आहे. मात्र, ते मी सांगू शकत नाही. राजकीय संबंधांनीच त्यांना असे करण्यास प्रोत्साहन दिले आहे. या घोटाळ्यात सहभागी असलेल्या राजकीय नेत्याला लाच मिळाल्याचा आरोपही स्वामी यांनी केला.

आयसीआयसीआय बँक घोटाळ्यातील बडा नेता कोण, हे मला माहीत आहे; पण मी नाव सांगणार नाही. कोणत्याही बँकरला राजकारण्यांचे समर्थन मिळाल्याशिवाय त्याची भ्रष्टाचार करण्याची हिंमत होणार नाही.
– डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी भाजप नेते

Back to top button