नेझल लस पुढील महिन्यात येणार | पुढारी

नेझल लस पुढील महिन्यात येणार

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : चीन, जपान, दक्षिण कोरिया, फ्रान्स आणि अमेरिकेसह अन्य काही देशांत बीएफ – 7 चा सबव्हेरियंट भारतातही आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर भारत बायोटेकच्या नाकावाटे देण्यात येणार्‍या (नेझल लस) कोरोना प्रतिबंधात्मक लसीची किंमत जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार या लसीची किंमत खासगी रुग्णालयासाठी 800 रुपये ठरली असून त्यावर 5 टक्के जीएसटी आकारला जाऊ शकतो. तसेच सरकारी रुग्णालयात या लसीची किंमत 325 रुपये असणार आहे.

जागतिक पातळीवर कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना भारताने कोणत्याही परिस्थितीत तोंड देण्याची तयारी सुरू केली आहे. भारत सरकारने याच अनुषंगाने कोरोनाच्या नेझल लसीला परवानगी दिली. ही लस येत्या जानेवारीच्या अखेरीस उपलब्ध होईल. मुख्य म्हणजे ही लस सर्वप्रथम खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध केली जाईल. ज्या व्यक्तीने दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांनाच ही लस उपलब्ध केली जाणार आहे.

दरम्यान, बूस्टर डोस घेण्याआधी त्या व्यक्तीने कोरोना लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. या दोन लसी घेतल्यानंतर 9 महिन्यांनी एखादी व्यक्ती बूस्टर डोस घेऊ शकते.

हे आहेत फायदे

* नाकावाटे लस देण्यात येणार असल्याने इंजेक्शनची गरज नाही.
* आरोग्य कर्मचार्‍यांना विशेष प्रशिक्षणाची आवश्यकता नाही.
* संसर्गाचा धोका घटेल आणि लस वाया जाण्याचे प्रमाण कमी.

लस घेण्यासाठी अशी करा नोंदणी

* cowin.gov.in/ या कोविनच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
* तुमच्या रजिस्ट्रेशन केलेल्या मोबाईलवरून लॉगइन करा आणि ओटीपी शेअर करा.
* लॉगइन झाल्यानंतर व्हॅक्सिन स्टेटसवर क्लिक करा व त्यानंतर उपलब्ध बूस्टर डोस या पर्यायावर क्लिक करा.
* पिनकोड, जिल्ह्याचे नाव टाकून जवळचे व्हॅक्सिन सेंटर शोधा.
* त्यानंतर तुम्हाला हवी ती तारीख आणि दिवस निवडा.
* तुमचा स्लॉट कन्फर्म करा. बूस्टर डोस घेतल्यानंतर वेबसाईटवरून त्याचे सर्टिफिकेट डाऊनलोड करा.

Back to top button