Bharat Jodo Yatra : पंतप्रधान मोदींनी ‘भारत जोडो यात्रे’त सहभागी व्हावे : काँग्रेसचे आवाहन | पुढारी

Bharat Jodo Yatra : पंतप्रधान मोदींनी 'भारत जोडो यात्रे'त सहभागी व्हावे : काँग्रेसचे आवाहन

नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) तिरंगा हातात घेऊन सहभागी व्हावे, आणि सर्व द्वेष संपवून टाकावेत, असे आवाहन काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी केले आहे. खोटे पसरवण्याऐवजी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी आणि यात्रेबद्दल निराधार चर्चा करण्याऐवजी केंद्र सरकारने अर्थव्यवस्था आणि रोजगारावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असेही ते म्हणाले. ते पत्रकारांशी संवाद साधत होते.

ते पुढे म्हणाले की, लोकांना जोडण्यासाठी, लोकांच्या मनातून द्वेष आणि मत्सर काढून टाकण्यासाठी राहुल गांधी यांनी भारत जोडो (Bharat Jodo Yatra)  यात्रा काढली आहे. पंतप्रधान मोदी यांना विनंती आहे की, त्यांनी या यात्रेत तिरंगा हातात घेऊन तीन तासासाठी सहभागी व्हावे. तसेच तुम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही सोबत आणा. त्यांना फक्त 15 मिनिटे चालायला लावा, स्मृती इराणींना पाच मिनिटे चालायला सांगा. यामुळे त्यांना याचा लाभ होईल, असेही ते म्हणाले.

जेव्हा हातात तिरंगा असेल आणि ‘भारत माता की जय’ आणि ‘हिंदुस्थान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या जातील, तेव्हा तुमच्यातील द्वेष, मत्सर आणि द्वेषाची भावना संपेल. मग तुम्ही लोक कंटेनर, टी-शर्ट, शूज याविषयी बोलणे बंद कराल आणि अर्थव्यवस्था कशी सुधारता येईल, रोजगार कसा उपलब्ध करता येईल, याचा विचार कराल. गेल्या ७० वर्षांत काँग्रेस सरकारने काहीही केलेले नाही, अशी टीका पंतप्रधान मोदी आणि भाजप नेत्यांकडून वारंवार केली जाते. मात्र, या ७० वर्षांच्या कालखंडामध्ये दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ६ वर्षे भाजप सरकारचे नेतृत्व केले होते, अशी आठवण वल्लभ यांनी करून दिली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button