भारताविरोधात चीन-पाकिस्तानची एकजूट : राहुल गांधी | पुढारी

भारताविरोधात चीन-पाकिस्तानची एकजूट : राहुल गांधी

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  चीन आणि पाकिस्तान भारताविरोधात एकत्रित आले आहेत. त्यामुळे भविष्यात एखादे युद्ध झाले तर भारताला एकावेळी एका नव्हे तर दोन्ही देशांविरोधात लढावे लागेल. देशाला खूप मोठे नुकसान सोसावे लागेल. भारतातील सद्य:स्थिती खूपच गंभीर आहे. पूर्वी दोन्ही आघाड्यांवर युद्ध होऊ नये, असे म्हटले जात होते. शत्रू देश एकजूट झाले असून ते केवळ लष्करीच नव्हे तर आर्थिकदृष्ट्याही मिळून काम करत असल्याचा इशारा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिला आहे.

तवांग मुद्द्यावरून भारत-चीनमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमी राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला हा इशारा दिला. ते म्हणाले की, २०१४ नंतर देशाची अर्थव्यवस्था मंदावली आहे. देशात अशांतता, युद्ध, संभ्रमावस्था आणि द्वेषाचे वातावरण आहे. आपली मानसिकता जॉईंट ऑपरेशन आणि सायबर युद्धाची नाही. देश अजूनही खूप दुबळा आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

सरकारने शांत राहून चालणार नाही

चीन आणि पाकिस्तान आपल्याला चकवा देत आहेत. त्यामुळे सरकारने आता शांत राहून चालणार नाही. सीमेवर काय घडले याची माहिती सरकारने जनतेला देण्याची गरज आहे. याची सुरुवातही आपल्याला आतापासून करावी लागणार आहे.

Back to top button