काश्मिरात पाकिस्तानी, चिनी शस्त्रांचा प्रचंड साठा हस्तगत | पुढारी

काश्मिरात पाकिस्तानी, चिनी शस्त्रांचा प्रचंड साठा हस्तगत

श्रीनगर, वृत्तसंस्था : काश्मिरात पोलिस आणि लष्कराने संयुक्तपणे केलेल्या कारवाईत प्रचंड शस्त्रसाठा जप्त केला आहे. त्यात 8 एके 74 रायफली, 12 चिनी पिस्तूल, शेकडो काडतुसे व पाकिस्तानी ग्रेनेडस्चा मोठा साठा हाती लागला.

पोलिस आणि लष्कराने गेल्याच आठवड्यात पाकिस्तानातून चालवले जाणारे एक मोठे ड्रग्ज रॅकेट उघडकीस आणले होते. पाठोपाठ आता हा घातक शस्त्रसाठा उरी सेक्टरमध्ये हस्तगत करण्यात आला. याबाबत कर्नल मनीष पुंज यांनी सांगितले की, एका छोट्या लढाईचा शस्त्रसाठा जप्त करण्यात यश आले असून त्यात 8 एके 74 रायफली, 24 मॅगझिन्स, 560 जिवंत काडतुसे, 12 चिनी पिस्तूल, 24 मॅगझिन्स, 14 पाकिस्तानी आणि चिनी ग्रेनेडस् तसेच पाकिस्तानी झेंडा छापलेले 81 बलून्स यांचा समावेश आहे.

एका खबर्‍याकडून शस्त्रसाठा आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस व लष्कराच्या संयुक्त पथकाने उरी सेक्टरमधील हथलंगा भागात नाकाबंदी करून घरांची झडती सुरू केली. त्यात हा साठा हस्तगत करण्यात आला.

Back to top button