भारताला कोरोनाचा तूर्त धोका नाही : डॉ. रणजित गुलेरिया | पुढारी

भारताला कोरोनाचा तूर्त धोका नाही : डॉ. रणजित गुलेरिया

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतात झालेले चांगले लसीकरण आणि नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती यामुळे भारतीयांमध्ये हायब्रीड रोग प्रतिकारशक्ती तयार झाली असल्याने यावेळी कोरोनाच्या लाटेचा भारताला फारसा धोका नसला तरी जानेवारीचा पहिला पंधरवडा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. याबाबत 15 जानेवारीपर्यंत स्थिती स्पष्ट होऊ शकते. त्या काळात भारतात कोरोनाचे किती रुग्ण वाढतात हे पाहणे महत्त्वाचे असेल, असे मत एम्सचे माजी संचालक डॉ. रणजित गुलेरिया यांनी व्यक्त केले आहे.

ते म्हणाले की, बीएफ 7 हा कोरोनाचा नवीन विषाणू ओमायक्रॉनच्या विषाणूची पुढील आवृत्ती आहे. भारतात ओमायक्रॉनच्या विषाणूच्या अनेक आवृत्त्या भारतात आहेतच. त्यामुळे भारतासाठी तो नवीन नाही.

भारतींयांची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती आणि चांगल्या लसीकरणामुळे तयार झालेली हायब्रीड रोगप्रतिकारशक्ती हे भारतीयांसाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळेच या नव्या लाटेचा भारतात फारसा परिणाम होणार नाही, असे ते म्हणाले.

सावधगिरीचा इशारा देताना डॉ. गुलेरिया म्हणाले की, 2019 मध्ये नवीन वर्षाआधीच्या सुट्ट्यांत चीनबाहेर गेलेल्या लोकांमुळे कोरोना विषाणू आधी इटलीत पोहोचला आणि नंतर त्याने जगभर थैमान घातले होते. त्यामुळे आताही जगभरात सुट्ट्यांचा कालावधी संपल्यानंतर म्हणजे साधारण जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यानंतर रुग्णसंख्या कशी आणि किती वाढते हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Back to top button