बेरोजगारीचा दर 8 टक्क्यांपेक्षा अधिक; ग्रामीणपेक्षा शहरी भागात विदारक चित्र | पुढारी

बेरोजगारीचा दर 8 टक्क्यांपेक्षा अधिक; ग्रामीणपेक्षा शहरी भागात विदारक चित्र

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  देशात बेरोजगारी वाढत असताना दुसरीकडे नोकर्‍या कमी होत आहे. देशातील बेरोजगारीचा दर सर्वात उच्चस्तरावर असून डिसेंबरच्या पहिल्या तीन आठवड्यात बेरोजगारीचा दर 8 टक्क्यांपेक्षा अधिक झाला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) च्या आकडेवारीनुसार. 18 डिसेंबरला संपलेल्या आठवड्यात शहरी बेरोजगारीचा दर 10.9 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. याचकाळात ग्रामीण बेरोजगारीचा दर 8.4 टक्के राहिला. नोव्हेंबर महिन्यात हाच दर 7.6 टक्के होता.

सीएमआयईचे प्रमुख महेश व्यास यांच्या म्हणण्यानुसार, 2020 मध्ये पहिल्या लॉकडाऊनमध्ये बेरोजगारीचा दर 6 ते 8 टक्क्यांच्या पुढे गेला नव्हता. गेल्या एका आठवड्यातील आकडेवारीनुसार. नोकरी शोधणार्‍यांची संख्या वाढत आहे, मात्र नोकर्‍यांच्या संधी उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. गेल्या काही महिन्यापासून वाढत असलेली बेरोजगारी चिंताजनक आहे. मात्र ग्रामीण भागात शेतमजूर उपलब्ध होत असल्याने गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत देशातील यंदाचा रब्बी हंगाम चांगला गेला आहे.

पुढील वर्षी सेवा क्षेत्रात संधी

यंदा सुमारे 91 रब्बी पिकांची कापणी झाली आहे. गेल्या दोन वर्षांतील हाच आकडा 88 टक्क्यांच्या आसपास होता. तसेच ताज्या अहवालानुसार, येत्या वर्षातील जानेवारी ते मार्चच्या चौथ्या तिमाहीत देशात नोकर्‍यांची संख्या वाढण्याचे संकेत मिळत आहेत. विशेषतः सेवा क्षेत्रातील 77 कंपन्या नोकर्‍या निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत.

Back to top button