प्रत्येक प्रकारच्या दहशतवादाचे कंबरडे मोदी सरकार मोडणार : राज्यमंत्री  कराड | पुढारी

प्रत्येक प्रकारच्या दहशतवादाचे कंबरडे मोदी सरकार मोडणार : राज्यमंत्री  कराड

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा :  दहशतवाद, मग तो कोणत्याही प्रकारचा असो मोदी सरकार त्याचे कंबरडे मोडणारच, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. केंद्रात 2014 साली भाजपचे सरकार सत्तेत आल्यापासून द्सरकारने दहशतवाद व टेरर फंडिंगबद्दल कठोर धोरण अवलंबले आहे, असे कराड यांनी यावेळी नमूद केले.

10 डिसेंबर हा दिवस जागतिक मानवाधिकार दिवस म्हणून ओळखला जातो. मानवी अधिकाराचे सर्वात जास्त उल्लंघन दहशतवादामुळे होत असते, असे सांगून डॉ. कराड पुढे म्हणाले, दहशतवादाने पीडित असलेल्या देशांत भारताचे प्राधान्याने नाव येते. केवळ सैनिक आणि पोलिसांचाच नव्हे तर असंख्य सामान्य नागरिकांचा दहशतवादाने बळी घेतलेला आहे. याविरोधात सरकारने अनेक मोहिमा हाती घेतलेल्या आहेत. त्यात राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएला जागतिक दर्जाची संस्था बनविणे, गैरकृत्य प्रतिबंधक कायदा मजबूत करून तो प्रभावीपणे राबविणे, टेरर फंडिगच्या मुसक्या आवळण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या पातळीवरून व्यापक प्रयत्न करण्यासाठी सरकारने घेतलेल्या पुढाकाराचा यात समावेश आहे.

अलीकडेच दिल्लीमध्ये इंटरपोलची वार्षिक परिषद पार पडली होती. त्या परिषदेत सीमेपलीकडील दहशतवादाच्या मुद्द्यावर प्रामुख्याने चर्चा करण्यात आल्याची माहिती देउन डॉ. कराड म्हणाले, पाकिस्तानवरील सर्जिकल स्ट्राईक असो अथवा बालाकोटमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्याची कारवाई असो, भारत दहशतवाद संपविण्याप्रती किती गंभीर आहे, हेच दिसून येते. चीनमधून भारतीय कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा येत आहे. यासंदर्भात विचारले असता चिनी गुंतवणूक व फंडिंगवरही सरकारचे लक्ष असल्याचे डॉ. कराड यांनी स्पष्ट केले.

Back to top button