देशात अचानक होणार्‍या मृत्यूंमागे कोरोना विषाणू? | पुढारी

देशात अचानक होणार्‍या मृत्यूंमागे कोरोना विषाणू?

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : नाचत असताना मृत्यू, व्यायाम करत असताना मृत्यू, भाषण देत असताना मृत्यू, वराला माळा घालताना वधूचा मृत्यू अशा अचानक मृत्यूच्या घटनांचे प्रमाण देशभरात वाढलेले आहे. यामागे कोरोना विषाणू तर कारणीभूत नाही ना, अशी शंका एम्समधील डॉक्टरांसह आरोग्य विज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

अचानक मृत्यूच्या बहुतांश घटना या हृदयविकाराचा धक्का बसून किंवा कार्डियाक अरेस्टने झाल्या आहेत. अचानक मृत्यूच्या अनेक प्रकरणांमध्ये पूर्वी हृदयविकाराची कुठलीही लक्षणे जाणवली नव्हती, अशीही प्रकरणे आहेत. देशभरात त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. या घटनांमागे कोरोना व्हायरस तर नाही, अशी शंका आता घेतली जात आहे. अचानक होणार्‍या या मृत्यूंवर हृदयविकार तज्ज्ञही चिंता व्यक्त करत आहेत.

एम्समधील कार्डियोलॉजी तज्ज्ञ डॉ. राकेश यादव यांनी याबाबत सांगितले की, या घटनांचा सध्या कोणताही डेटा उपलब्ध नाही. घटनांचे स्वरूप पाहून त्यांचा संबंध कोरोना महामारीशी असू शकतो असे वाटते. इंडियन हार्ट जर्नलमध्ये प्रकाशित यादव यांच्या एका लेखात सदृढ दिसणार्‍या व्यक्तीचाही कोरोना विषाणूमुळे मृत्यू होऊ शकतो, असे म्हटलेले होते. विषाणूसंसर्ग व हृदयाशी संबंधित आजारांच्या वाढत्या जोखमीचा संबंध दाखवणारे काही पुरावे समोर आले आहेत.

12 वर्षांच्या मुलाचा हृदयविकाराने मृत्यू

भोपाळ : स्कूलबसमधून घरी जात असताना 12 वर्षांच्या मुलाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. मनीष जाटव असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी 2 च्या सुमारास ही घटना घडली. प्रकृती बिघडल्याने स्कूलबस चालकाने त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपयोग झाला नाही. मनीषच्या कुटुबियांनी शवविच्छेदनाला नकार दिल्याने मृतदेह त्याच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आला. मनीषला आरोग्याबाबत कोणतीही समस्या नव्हती, अशी माहिती मनीषच्या वडिलांनी दिली.

तज्ज्ञांचा सल्ला काय?

वय कमी आहे व आपण सुदृढ आहोत, या भ्रमात न राहता वेळोवेळी आरोग्य तपासणी करायला हवी.

Back to top button