पेट्रोल, डिझेल तीन रुपयांनी महागणार | पुढारी

पेट्रोल, डिझेल तीन रुपयांनी महागणार

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : जीएसटी कौन्सिलच्या परिषदेनंतर पेट्रोल, डिझेलचे दर उतरतील, या आशेवर आधीच पाणी फिरलेले आहे. आता काही राज्यांत तोंडावर आलेल्या निवडणुका आणि पोटनिवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवरही इंधनाचे दर लिटरमागे तीन रुपयांनी वाढतील, अशी शक्यता आहे.

निवडणूक असल्याने इंधन दरवाढ तूर्तास तरी होणार नाही, या आशेवर बरेच जण आहेत. मात्र, खालावलेल्या दरांच्या अपेक्षेत असलेल्या सर्वांना लवकरच जोराचा झटका बसू शकतो. कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाल्याने देशात नजीकच्या काळात इंधनाचे दर आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कच्च्या तेलाचा बेंचमार्क असलेले ‘ब्रेंट क्रूड’ सोमवारी बॅरलमागे 75 डॉलर्सच्या भावपातळीला भिडले आहे. नजीकच्या काळात त्याचा परिणाम म्हणून इंधन दरात लिटरमागे तीन रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

महिनाभरापूर्वी कच्च्या तेलाचे दर बॅरलला 69.03 डॉलर्स होते. चालू आठवड्यात ते 75.34 डॉलर्सपर्यंत गेले आहेत. ही भाववाढ 9.1 टक्के आहे. खालावलेल्या कोरोना दरामुळे आर्थिक उलाढाल वाढली आहे. परिणामी, इंधनाची मागणीही वाढत आहे आणि वाढणार आहे. सरकारी तेल कंपन्यांकडून पेट्रोल वा डिझेलमध्ये सोमवारी मात्र कोणतीही दरवाढ झालेली नाही.

दरवाढ अपरिहार्य

काही दिवसांपासून देशात पेट्रोल, डिझेलच्या किमती स्थिर आहेत. तथापि, आंतरराष्ट्रीय बाजारात किमती वाढल्यामुळे तेल कंपन्यांना अत्यंत कमी मार्जिनचा सामना करावा लागणार आहे. या पार्श्‍वभूमीवर देशात इंधन दरातील वाढ अपरिहार्य आहे.

Back to top button