बिहारमधील दारू दुर्घटनेचे राज्यसभेतही तीव्र पडसाद | पुढारी

बिहारमधील दारू दुर्घटनेचे राज्यसभेतही तीव्र पडसाद

नवी दिल्ली-पाटणा; वृत्तसंस्था :  बिहारमधील विषारी दारू दुर्घटना प्रकरणातील बळींची संख्या 42 झाली असून या विषयावरून गुरुवारी राज्यसभेत तीव्र गदारोळ झाला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज दोनदा तहकूब करावे लागले.

बिहारमध्ये विषारी दारूचे सेवन केल्यामुळे झालेल्या मृत्यूप्रकरणी राज्यसभेत चिंता व्यक्त करण्यात आली. तथापि, त्यानंतर या विषयावरून सदस्यांमध्ये वादावादी सुरू झाली. गोंधळ एवढा वाढला की, पीठासन अधिकार्‍यांना हा गोंधळ थांबवण्यासाठी कामकाज तहकूब करावे लागले. पहिल्यांदा पंधरा मिनिटांसाठी कामकाज तहकूब केल्यानंतर पुन्हा सभागृहाचे कामकाज सुरू झाले. मात्र, त्यानंतही गोंधळ सुरूच राहिला. परिणामी, पुन्हा एकदा सभागृहाचे कामकाज तहकूब करणे पीठासन अधिकार्‍यांना भाग पडले.

दारूबंदी पूर्णपणे अयशस्वी

बिहारमध्ये दारूबंदी असली, तरी ती अयशस्वी ठरल्याचे दिसून येते. प्रशासकीय अधिकार्‍यांच्या संगनमताने या राज्यात खुलेआम दारू व्यवसाय सुरू असून दारू माफिया फोफावत आहेत. याबद्दल आता खुनाच्या आरोपाखाली दारू माफियांविरुद्ध गुन्हे दाखल केले जावेत, अशी मागणी महिलावर्गातून जोर धरू लागली आहे.

विषारी दारू पिणार, तो मरणार

बिहारमधील छपरा येथे विषारी दारूमुळे आतापर्यंत 42 जणांचा मृत्यू झाला आहे. 30 रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. याप्रकरणी दोघा स्थानिक अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच यासंबंधीच्या तपासाकरिता विशेष चौकशी पथक स्थापन करण्यात आले आहे. संशयावरून एकूण 20 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटले आहे की, विषारी दारूमुळे सुरुवातीपासूनच लोक मरत आले आहेत. सर्वांनी सतर्क राहावे. दारूबंदी झाली की, खराब दारू मिळेल. जो विषारी दारू पिणार तो मरणार, असेही ते म्हणाले.

हे बिहारचे दुर्दैव : गिरीराज सिंह

दारूमुळे गेलेले बळी हे बिहारचे दुर्दैव असल्याचे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी म्हटले आहे. बिहारमध्ये दारू धोरण लागू झाल्यापासून हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. तथापि, मुख्यमंत्र्यांची सहानुभूती जागृत होत नाही, असे त्यांनी सांगितले.
दारूबंदी लागू झाल्यानंतर 6 वर्षांत विषारी दारूमुळे 1000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा राज्यसभेचे खासदार सुशील मोदी यांनी केला आहे.

या दारू घोटाळ्याचे प्रकरण बिहार विधानसभेतही गाजले. तेथे भाजप आमदारांनी सभागृहात रुद्रावतार धारण करून नितीश कुमार सरकारला धारेवर धरले.

Back to top button