

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : DRDO : भारताने गुरुवारी अग्नी-5 क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीरीत्या पार पाडली. या अण्वस्त्रसज्ज बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची मारक क्षमता पाच हजार किलोमीटरपर्यंत आहे. लक्ष्याचा अचूक भेद घेण्यात ते तरबेज आहे.
क्षेपणास्त्रात काही तांत्रिक बदल करण्यात आले असून, ते आता आधीपेक्षा वजनाने हलके झालेले आहे. त्यामुळेच त्याची चाचणी घेण्यात आली. हे क्षेपणास्त्र भारतातून थेट चीनच्या अनेक शहरांवर अणुहल्ला करू शकते. क्षेपणास्त्राची लांबी 17.5 मीटर लांब आणि व्यास 2 मीटर आहे. हे क्षेपणास्त्र रात्रीही हल्ला करू शकते. 1500 किलो अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असलेले हे क्षेपणास्त्र 5 हजार किमीपेक्षा जास्त अंतरावरील शत्रूंची ठिकाणे नष्ट करू शकते.
DRDO : अग्नी-5 ची वैशिष्ट्ये
– चीन, पाकिस्तानसह रशिया, युक्रेन, इंडोनेशिया आदी देशही त्याच्या टप्प्यात आहेत. डीआरडीओ, भारत डायनॅमिक्स लिमिटेडने ते बनवले आहे. अग्नी-5 50 हजार किलोचे आहे.
– रॉकेट बूस्टर तीन टप्प्यांत बसवण्यात आले असून, ध्वनीच्या वेगापेक्षा 24 पट अधिक वेगाने हे क्षेपणास्त्र मारा करेल. एका सेकंदाला ते 8.16 किमी अंतर कापते.