अजित पवार यांना दिलासा; मालमत्तेवरील जप्ती सर्वोच्च न्यायालयाने उठविली | पुढारी

अजित पवार यांना दिलासा; मालमत्तेवरील जप्ती सर्वोच्च न्यायालयाने उठविली

पुढारी वृत्तसेवा नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या तात्पुरत्या स्वरूपात जप्त केलेल्या मालमत्तेवरील जप्ती सर्वोच्च न्यायालयाने उठविली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबईच्या आयकर विभागाने ही जप्ती हटविल्याचे सूत्रांकडून बुधवारी सांगण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी दिलासादायक मानला जात आहे.

गुरू कमॉडिटीज प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीच्या माध्यमातून खरेदी केलेल्या मालमत्तेवरील जप्तीचे आदेश मुंबई आयकर विभागाने मागे घेतले आहेत. या मालमत्तेत जरंडेश्वर साखर कारखाना, काही जमीन आणि इमारतीचा काही भाग यांचा समावेश होता. सातारा येथील चिमणगाव गावातील मालमत्तेच्या जप्तीचे आदेशही मागे घेण्यात आल्याचे समजते.

आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरून सक्तवसुली संचलनालयाने जरंडेश्वर साखर कारखाना जप्त केला होता. सातारा जिल्हा बँकेने या कारखान्याला 96 कोटी रुपयांचे तर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने 225 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. जरंडेश्वर कारखान्याने थकीत कर्ज न भरल्याने कारखाना जप्त करण्यात आला होता. माजी आमदार शालिनीताई पाटील या कारखान्याच्या संस्थापक आणि चेअरमन होत्या. जरंडेश्वर कारखाना थकीत कर्जामुळे लिलावात काढण्यात आला होता. हा लिलाव हेतूपुरस्सर असल्याचा आरोपही करण्यात आला होता. ज्या कंपनीची वार्षिक उलाढाल एक कोटी रुपयांहून कमी होती, त्या कंपनीने हा 60 कोटी रुपयांहून अधिक किंमत देऊन खरेदी केला होता. यात गैरव्यवहार असल्याचा आरोप झाल्यानंतर ईडीने कारवाई केली होती.

हेही वाचलंत का?

Back to top button