सीमाप्रश्नी आज दिल्लीत बैठक; शिंदे, बोम्मईंशी गृहमंत्री शहा करणार चर्चा | पुढारी

सीमाप्रश्नी आज दिल्लीत बैठक; शिंदे, बोम्मईंशी गृहमंत्री शहा करणार चर्चा

नवी दिल्ली, बेळगाव ; पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची बैठक बुधवारी (दि. 14)दिल्लीत बोलावली आहे. तब्बल 20 वर्षांनंतर दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची संयुक्त बैठक होणार असल्याने सीमावासीयांच्या नजरा बैठकीकडे लागून राहिल्या आहेत. यापूर्वी 2002 मध्ये दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक दिल्लीत झाली होती.

गेल्या काही दिवसांपासून सीमाप्रश्नावरून महाराष्ट्र-कर्नाटक संबंध ताणले गेले आहेत. महाराष्ट्रातील वाहनांवर कर्नाटकात हल्ले करण्यात आल्याने महाराष्ट्राने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात येण्यास कर्नाटकने निर्बंध घातले. महाराष्ट्राच्या विरोधी आणि सत्ताधारी पक्षांच्या खासदारांनी कर्नाटकाच्या या आगळिकीची गंभीर दखल घेत गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे धाव घेतली. खासदार सुप्रिया सुळे, सीमाप्रश्न उच्चाधिकारी समितीचे नवे अध्यक्ष खासदार धैर्यशील माने यांनी लोकसभेमध्ये सीमाप्रश्नाचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी शिंदे-बोम्मई बैठक बोलावली. बुधवारी शहांच्या निवासस्थानी ही बैठक होण्याची शक्यता आहे.

दरम्यान गुजरात मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक मुख्यमंत्र्यांची भेट सोमवारी अहमदाबाद विमानतळावर झाली. त्यावेळी दोन्ही मुख्यमंत्र्यांदरम्यान चर्चा झाली. पण फलित कळले नाही. यापूर्वी सप्टेंबर 2002 मध्ये तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक आयोजित केली होती. महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, कर्नाटकचे मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा दिल्लीत दाखल झाले होते. परंतु, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी तब्येत बरी नसल्याने कारण देत बैठकीत सहभाग घेणे टाळले होते. त्यानंतर महाराष्ट्राने सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात 2004 मध्ये दावा दाखल केला.

Back to top button