बेरोजगार तरूणांच्या समस्या सोडवू : राहुल गांधी | पुढारी

बेरोजगार तरूणांच्या समस्या सोडवू : राहुल गांधी

सवाईमाधवपूर, वृत्तसंस्था : तरुणांना नोकरी मिळण्याबाबतच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिली. भारत जोडो यात्रेत अनेक तरुणांची राहुल गांधी यांची भेट घेऊन आपले गार्‍हाणे मांडले. सध्या यात्रा राजस्थानमध्ये आहे. दरम्यान, यात्रेदरम्यान काही अज्ञात लोकांनी राहुल गांधी यांच्या तंबूला आग लावण्याचा प्रयत्न केला.

सोमवारी उशिरा रात्री अज्ञात लोक मोटारीतून आले. त्यावेळी कार्यकर्त्यांसाठी जेवण तयार केले जात होते? याचवेळी 11 ते 15 अज्ञातांनी राहुल गांधी यांचा तंबू जाळण्याचा प्रयत्न केला. यानंतर काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांनी दिली. घटनास्थळी पाठलाग करून चौघा जणांना अटक केली. दरम्यान राजस्थानातील पहिला टप्पा पार केलेल्या काँग्रेसचे नेते जयराम रमेश म्हणाले की, 16 डिसेंबर रोजी दौसामध्ये राहुल गांधी पत्रकार परिषद घेतील.

यात्रेचा दुसरा टप्पा सुरू झाला असून यादरम्यान मंगळवारी सकाळी एका बेरोजगार उर्दू शिक्षकाने राजस्थानातील पॅटर्नबाबत राहुल गांधी यांच्याकडे तक्रार केली. मुस्लिमांकडे केवळ व्होट बँक म्हणून पाहिले जाते; मात्र आम्हाला आमचे अधिकार मिळत नाहीत.

मुस्लिम बेरोजगार तरुणांनी राहुल गांधी यांच्याकडे आपली व्यथा मांडली. 2021 मध्ये 2100 उर्दू शिक्षकांची भरती केली जाणार होती; मात्र केवळ 300 शिक्षकांची भरती करण्यात आली. त्यामुळे मुस्लिमांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढले असल्याचे तरुणांनी सांगितले.

भाजपकडून तरुणांची स्वप्ने धुळीस

राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या अग्निवीर योजनेवर टीका केली. ते म्हणाले, अग्निवीरांना चार वर्षांनंतर लष्करातून बाहेर फेकले जाईल. भाजपने कोट्यवधी तरुणांची स्वप्ने धुळीस मिळवली आहेत. यात्रेला 16 डिसेंबरला 100 दिवस पूर्ण होणार आहेत. यानिमित्त एका संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात गायिका सुनिधी चव्हाण सहभागी होणार आहेत.

Back to top button