

पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्नाटकच्या बागलकोट जिल्ह्यात एका 20 वर्षीय मुलाने आपल्या वडिलांचा खून करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून ते बोअरवेलमध्ये फेकल्याची घटना उघडकीस आली आहे. खून करणा-या तरुणाचे नाव विठ्ठल असे असून सोमवारी पोलिसांनी त्याला अटक केल्याचे समोर आले आहे. (Chop Father's Body)
याबाबतची अधिक माहिती अशी की, संशयीत आरोपी विठ्ठलने त्याचे वडील परशुराम यांचा खून केल्याचा कबुली जबाब पोलिसांना दिला. यानंतर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याचे वडील हे त्याला दारूच्या नशेत मारहाण करत असायचे. ६ डिसेंबर रोजी झालेल्या भांडणात वडीलांच्या त्रासाला कंटाळून विठ्ठलने वडीलांच्या डोक्यात लोखंडी रॉडचा घाव घातला. यामध्ये त्यांच्या जागीच मृत्यू झाला. (Chop Father's Body)
वडीलांच्या मृत्यूला कारणीभूत असलेला विठ्ठल घाबरला. त्याने या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे ठरविले. यासाठी या मृतदेहाचे तुकडे करुन स्वत:च्या शेतातील विहिरीत टाकले. या घटनेनंतर विठ्ठल काही काळ बेपत्ता झाला. शनिवारी परत घरी आल्यानंतर त्याने कुटुंबियांना वडिलांशी भांडण झाल्याने घर सोडून गेल्याचे कारण सांगितले. सोमवारी पोलिसांनी या घटनेच्या चौकशीसाठी विठ्ठलला बोलावले. यावेळी त्याने मीच वडीलांचा खून केल्याची कबुली दिली.