Gujarat CM oath ceremony | भूपेंद्र पटेल यांनी सलग दुसऱ्यांदा घेतली गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी शपथ, पीएम मोदी, गृहमंत्री शहांची उपस्थिती | पुढारी

Gujarat CM oath ceremony | भूपेंद्र पटेल यांनी सलग दुसऱ्यांदा घेतली गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी शपथ, पीएम मोदी, गृहमंत्री शहांची उपस्थिती

गांधीनगर : पुढारी ऑनलाईन; भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांनी आज सोमवारी (दि.१२) गुजरातचे १८ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ते सलग दुसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी (Chief Minister of Gujarat) विराजमान झाले आहेत. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. भाजपच्या गुजरातमधील विक्रमी विजयामुळे हा शपथविधी सोहळा शानदार करण्यात आला. या शपथ सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रिओ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, आसामचे मुख्यमंत्री एच. बी. सरमा, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांची उपस्थिती होती. (Gujarat CM oath ceremony) गांधीनगर येथील नवीन सचिवालयाजवळील हेलिपॅड मैदानावर हा शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, हर्ष संघवी, जगदीश विश्वकर्मा, नरेश पटेल, बच्चूभाई खाबाद आणि परषोत्तम सोलंकी यांनीही मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेतली.

१५६ जागांवर विक्रमी विजय मिळवत गुजरातचा गड काबीज केलेल्या भाजपने भूपेंद्र पटेल यांना सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी निवडले. नुकत्याच पार पडलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने आतापर्यंतचे सारे विक्रम मोडीत काढत विजयाची सप्तपदी पूर्ण केली. १८२ जागांपैकी १५६ जागा जिंकत भाजपने (Gujarat Election) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्याची जणू सुनामी अनुभवली. मागील वेळी ७८ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला यावेळी मात्र दारुण पराभव पत्करावा लागला. त्यांना अवघ्या १७ जागाच मिळविता आल्या; तर आम आदमी पार्टीला केवळ ५ जागा मिळविता आल्याने त्यांचा दिल्ली पॅटर्न निष्प्रभ ठरला.

Image

भूपेंद्र पटेल यांचा इंजिनिअर ते मुख्यमंत्रीपदापर्यंतचा प्रवास…

भूपेंद्र पटेल यांचा जन्म १५ जुलै १९६२ रोजी अहमदाबादमध्ये झाला. लोक त्यांना भूपेंद्र दादा म्हणतात. भूपेंद्र पटेल हे गुजरातमधील पाटीदार समाजातील आहेत. पाटीदार आंदोलनप्रश्नी तोडगा काढण्यात भूपेंद्र पटेल यांची महत्त्वाची भूमिका राहिली होती. भूपेंद्र हे अनेक पाटीदार संघटनांचे प्रमुखही आहेत. त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगमधून डिप्लोमा केला आहे. ते सुरुवातीपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले आहेत. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी बिल्डर म्हणून करण्यास सुरुवात केली होती.

१९९५ मध्ये पहिल्यांदा निवडणूक जिंकली…

१९९५ मध्ये ते पहिल्यांदा अहमदाबादच्या मेमनानगर नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. यानंतर ते १९९९ आणि २००४ मध्येही नगरसेवक होते. १९९९ ते २००४ दरम्यान ते नगराध्यक्षही होते. २०१७ मध्ये भूपेंद्र पटेल यांनी पहिल्यांदा घाटलोडिया विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते विक्रमी १.१७ लाख मतांनी विजयी झाले. यानंतर त्यांचा राजकीय क्षेत्रात प्रभाव वाढला. त्यावेळी विजय रुपाणी मुख्यमंत्री होते. आता नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पटेल यांनी घाटलोडिया मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि त्यांनी १.९२ लाख मतांनी विजय मिळवला.

नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर आनंदीबेन पटेल यांना गुजरातच्या मुख्यमंत्री करण्यात आले. २२ मे २०१४ ते ७ ऑगस्ट २०१६ दरम्यान त्या मुख्यमंत्रीपदावर होत्या. त्यानंतर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी विजय रुपाणी यांच्याकडे देण्यात आली. पण ते २०२१ मध्ये मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाले. त्यानंतर भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. भूपेंद्र हे आनंदीबेन पटेल यांच्या विश्वासातील मानले जातात. त्यांना राजकारणाशिवाय क्रिकेट, बँडमिंटन खेळण्याची आवड आहे. ते नियमित योगा करतात.

घाटलोडियामधून सलग दुसरा विजय

भूपेंद्र पटेल हे दुसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. पटेल हे घाटलोडिया विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. यापूर्वी माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल या घाटलोडियामधून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. २०१२ च्या गुजरात निवडणुकीत आनंदीबेन पटेल यांनी काँग्रेसच्या रमेशभाई पटेल यांचा १ लाख १० हजार मतांनी पराभव केला होता. यानंतर आनंदीबेन गुजरातच्या मुख्यमंत्री झाल्या. तर २०१७ मध्ये भूपेंद्र पटेल यांनी काँग्रेसच्या शशिकांत भुराभाई यांचा १ लाख १७ हजार मतांनी पराभव केला होता. त्यानंतर पटेल मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. नुकत्यात पार पडलेल्या निवडणुकीत भाजपने याच जागेवरून भूपेंद्र पटेल यांना पुन्हा उमेदवारी दिली. त्यांचा सामना काँग्रेसच्या अमी याज्ञनिक आणि आम आदमी पक्षाचे विजय पटेल यांच्याशी झाला. (Gujarat CM oath ceremony)

गुजरात असा राहिले आहे भाजपचा बालेकिल्ला!

  • गुजरातेत १७ महिन्यांचा अपवाद सोडला तर गेल्या २७ वर्षांपासून भाजपचे सरकार आहे. पुढे आणखी ५ वर्षे ते असेलच असेल.
  • १९९५ मध्ये पहिल्यांदा केशूभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली गुजरातेत भाजपचे सरकार स्थापन झाले.
  • ऑक्टोबर १९९६ मध्ये भाजपचे नेते शंकरसिंह वाघेला यांनी पक्षाविरुद्ध बंड करून काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केले… वाघेला यांनी बंडानंतर राष्ट्रीय जनता पार्टी नावाने नवा पक्ष स्थापन केला होता.
  • ऑक्टोबर १९९७ मध्ये वाघेला यांनी राजीनामा दिला. ‘राजप’- चेच दिलीप पारिख मुख्यमंत्री बनले. मार्च १९९८ पर्यंत ते या पदावर होते. १९९५ नंतरचे हेच १७ महिने भाजपचे सरकार राज्यात नव्हते.
  • गत निवडणुकीत भाजपला ९९, तर काँग्रेसला ७८ जागा मिळाल्या होत्या.
  • २०१२ च्या निवडणुकीत भाजपला ११५, तर काँग्रेसला ६१ जागांवर विजय मिळाला होता.
  • २००७ मध्ये भाजपला ११७ व काँग्रेसला ५९, २००२ मध्ये भाजपला १२७ व काँग्रेसला ५१, १९९८ मध्ये भाजपला ११७ व काँग्रेसला ५३ जागा,
  • १९९५ मध्ये भाजपला १२१ व काँग्रेसला ४५ जागा मिळाल्या होत्या.


हे ही वाचा :

Back to top button