‘आप’ने गुजरातेत काँग्रेसचा खेळ खराब केला : अशोक गेहलोत | पुढारी

‘आप’ने गुजरातेत काँग्रेसचा खेळ खराब केला : अशोक गेहलोत

बुंदी, वृत्तसंस्था : गुजरातमधील पराभवाचे खापर काँग्रेसने आम आदमी पक्षावर फोडले आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री व गुजरातचे प्रभारी अशोक गेहलोत व माजी केेंद्रीय मंत्री पी. चिदम्बरम यांनी काँग्रेसचा खेळ ‘आप’ने खराब केला, असा थेट आरोप केला आहे. धादांत खोट्या गोष्टींचा प्रचार करून ‘आप’ने काँग्रेसची मते फोडली, असे या नेत्यांचे म्हणणे आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना गेहलोत यांनी आरोप केला की, ‘आप’ने गुजरातमध्ये काँग्रेसच्या मतपेटीला भगदाड पाडले हे स्पष्टच दिसत आहे. खोटा प्रचार करीत त्यांनी काँग्रेसची मते खाल्ली; अन्यथा गेल्या निवडणुकीत 78 जागा पटकावणार्‍या काँग्रेसला यावेळी सत्तेत येण्याची संधी होती. माजी मंत्री पी. चिदम्बरम यांनीही गुजरात पराभवाचे खापर ‘आप’वरच फोडले. आम आदमी पक्षामुळे शहरी भागात काँग्रेसला फटका बसल्याचे ते म्हणाले.

74 टक्के उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

गुजरातमध्ये प्रमुख पक्षांचे उमेदवार आणि अपक्ष अशा सुमारे 74 टक्के उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. भाजपच्या या झंझावातात काँग्रेसच्या 42 तर आपच्या 128 उमेदवारांना अनामत गमवावी लागली. दुसरीकडे, यंदाच्या विधानसभेत गुजरातमध्ये अवघा एक मुस्लिम उमेदवार निवडून येऊ शकला. काँग्रेसचे इम्रान खेडावाला वगळता एकही मुस्लिम उमेदवार विधानसभेत पोहोचू शकलेला नाही. 2017 च्या निवडणुकीत तीन मुस्लिम आमदार होते.

Back to top button