साधी पदवी 3 वर्षे, ऑनर्सची 4 वर्षे; विद्यापीठ अनुदान आयोगाने तयार केली नवीन नियमावली | पुढारी

साधी पदवी 3 वर्षे, ऑनर्सची 4 वर्षे; विद्यापीठ अनुदान आयोगाने तयार केली नवीन नियमावली

नवी दिल्ली;  वृत्तसंस्था :  नवीन शैक्षणिक धोरणानुसार पदवी अभ्यासक्रमांचे स्वरूप बदलले जाणार असून आता ऑनर्सची पदवी करण्यासाठी चार वर्षे लागणार आहेत; तर साधी पदवी तीन वर्षांची असणार आहे.

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पदवी अभ्यासक्रमात बदल सुचवण्यात आला होता. त्यानुसार विद्यापीठ अनुदान आयोगाने आराखडा, नियमावली व संभाव्य अभ्यासक्रम तयार केला आहे. त्यानुसार साधा पदवी अभ्यासक्रम तीन वर्षांचा व ऑनर्सचा पदवीचा अभ्याक्रम चार वर्षांचा असणार आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना ऑनर्ससाठी शेवटच्या वर्षात संशोधन विषय घेता येणार असून त्यांना ऑनर्सची पदवी त्या संशोधन विषयाची मिळणार आहे. सध्या क्रेडिट पद्धतीनुसार पदवी अभ्यासक्रम शिकणार्‍या विद्यार्थ्यांना त्या अभ्यासक्रमाचे चार वर्षांच्या अभ्यासक्रमात रूपांतर करण्याची संधी मिळणार असून त्यासाठी विद्यापीठाने निर्धारित केलेले काही ब्रिजिंग अभ्यासक्रम करावे लागतील. दुसर्‍या सेमिस्टरनंतर विद्यार्थ्यांना आपला प्रमुख विषय बदलण्याची संधी असणार आहे. तसेच मुख्य विषय एक ठेवायचा की दोन हे देखील विद्यार्थ्याला ठरवण्यात येणार आहे. सध्याच्या पद्धतीनुसार तीन वर्षांतच ऑनर्सची पदवी विद्यार्थ्याला मिळते.

असा असेल अभ्यासक्रम

विद्यापीठ अनुदान आयोगाने सादर केलेल्या आराखड्यात चार वर्षांच्या अभ्यासक्रमाचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार त्यात प्रमुख विषय, द्वितीय विषय, इतर विद्या शाखांतील विषय, भाषाविषयक आणि कौशल्य विषय, पर्यावरण शिक्षण, भारताची ओळख, डिजिटल आणि तंत्रज्ञानाधारित पर्याय, आरोग्य, योगशिक्षण, क्रीडा आणि फिटनेस यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

Back to top button