हिमाचल प्रदेशात मुख्यमंत्रिपदावरून राडा | पुढारी

हिमाचल प्रदेशात मुख्यमंत्रिपदावरून राडा

शिमला; वृत्तसंस्था : हिमाचल प्रदेश काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदावरून प्रचंड राडा सुरू आहे. मुख्यमंत्रिपदावर राज्यातील सिहा नेत्यांनी दावा केला आहे.

शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता बोलावलेल्या आमदारांच्या बैठकीला केवळ 11 जण वेळेवर हजर झाले. पक्ष निरीक्षकही आमदारांची प्रतीक्षा करत तिष्ठत राहिले. यादरम्यान, प्रतिभा सिंह यांच्या समर्थकांनी काँग्रेस कार्यालयाला घेराव घातला. प्रतिभा सिंह यांनाच मुख्यमंत्री करावे, अशी नारेबाजी ते करत होते.

प्रतिभा सिंह या माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या पत्नी आहेत. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा, प्रदेश प्रभारी राजीव शुक्ला व छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी राज्यपालांकडे सरकार स्थापन करण्याचा दावा सादर केला खरा; पण त्यांच्यासोबत राज्यातील एकही नेता उपस्थित नव्हता. सायंकाळच्या बैठकीला प्रदेशाध्यक्ष प्रतिभा सिंह यांच्यासह मुख्यमंत्रिपदाचे धनीराम शांडिल व राजेंद्र राणा हे अन्य दोघे दावेदारही काँग्रेस कार्यालयात पोहोचले.

मोहनलाल, नंदलाल, हर्षवर्धन चौहान, रोहित ठाकूर, जगतसिंह नेगी, सुंदर ठाकूर, देवेंद्र कुमार भुट्टो, आर. एस. बाली हे आमदार बैठकीसाठी पोहोचले होते. मुख्यमंत्रिपदाचे आणखी एक दावेदार सुखविंदर सुक्खू यांचे समर्थक आमदार उशिरा आले.

मुख्यमंत्रिपद 1, इच्छुक 6

प्रतिभा सिंह, मुकेश अग्निहोत्री, सुखविंदर सिंह, राजेंद्र राणा ठाकूर, चंद्र कुमार, धनीराम शांडिल

Back to top button