Maharashtra-Karnataka border row | अमित शहा करणार महाराष्ट्र-कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा, खासदारांच्या शिष्टमंडळाने घेतली शहांची भेट | पुढारी

Maharashtra-Karnataka border row | अमित शहा करणार महाराष्ट्र-कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा, खासदारांच्या शिष्टमंडळाने घेतली शहांची भेट

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : संसदेतच्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचे पडसाद उमटत आहेत. अशात पेटलेल्या सीमावादासंबंधी महाविकास आघाडीच्या खासदारांनी शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान खासदारांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची शहा यांच्याकडे तक्रार केली. १४ डिसेंबरला गृहमंत्री शहा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्याशी चर्चा करतील, अशी माहिती खासदारांनी दिली. सीमावादावर परस्पर समन्वयाने तोडगा काढू, असे आश्वासन गृहमंत्र्यांनी दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली. (Maharashtra-Karnataka border row)

सीमावादाचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून सातत्याने वक्तव्ये केली जात आहे. महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ले केले जात आहेत. राज्यातील मंत्र्यांना कर्नाटकमध्ये येण्यापासून रोखले जात आहे. संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार देशात कुठेही जाण्याचा हक्काची पायामल्ली केली जात आहे. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्र्यांकडे तक्रार केली असून त्यांनी खासदारांची बाजू संवेदनशीलपणे ऐकून घेतल्याचे कोल्हे म्हणाले.

बेळगाव, निपाणी, कारवार, बिदर या सगळ्या सीमाभागात मराठी बांधव असून त्याच्यावर सातत्याने अत्याचार होतोय. त्यांच्यावर कानडी वरवंटा फिरवला जात आहे. या सर्वांवर कधीतरी चाप बसेल अशी अपेक्षा असल्याचे कोल्हे यावेळी म्हणाले. गुरूवारी गृहमंत्र्यांची भेटीची वेळ मागितली होती. कामांच्या व्यस्ततेमुळे त्यांची भेट होवू शकली नव्हती. पंरतु, त्यांनी आज वेळ दिल्याने त्यांची भेट घेतल्याचे कोल्हे म्हणाले.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत चुकीचं वक्तव्य केल्याप्रकरणी सर्वपक्षीय खासदारांनी एकत्र येणे गरजेचे होते. पंरतु, दुर्दैवाने तसे झाले नसल्याचे खासदार राजन विचारे म्हणाले. आम्ही बोलत असताना सभागृहात माईक बंद करण्याचे काम सुरु असल्याचेही विचारे म्हणाले. (Maharashtra-Karnataka border row)

हे ही वाचा :

Back to top button