१३ डिसेंबरला पुणे बंद; विराट मोर्चाही काढला जाणार | पुढारी

१३ डिसेंबरला पुणे बंद; विराट मोर्चाही काढला जाणार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ सर्व धर्मिय शिवप्रेमी पुणेकरांच्या वतीने मंगळवार दि. १३ डिसेंबर रोजी दु. ३.०० वाजेपर्यंत पुणे बंदचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सर्वधर्मीय शिवप्रेमी पुणेकर यांच्या वतीने पत्रकार परिषदेत दिली.

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने संविधानिक पदावर असलेले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळातील काही मंत्री वाचाळवीराप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची तसेच महात्मा ज्योतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधाने करून इतिहासात नोंद नसलेल्या गोष्टींचा दाखला देऊन, बदनामीकारक वक्तव्य करीत आहेत. या बाबत राज्याचे मुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान हे मूग गिळून बसले असून या बाबत त्यांनी कोणतीही नापसंती व्यक्त केली नाही. पुणे ही छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी व महात्मा ज्योतीराव फुले, सावित्रीबाई फुले यांची कर्मभूमी आहे. पुणेकर म्हणून या राष्ट्रपुरुषांचा अपमान आम्ही सहन करणार नाही.

या वाचाळ वीरांना योग्य तो संदेश देण्यासाठी सर्वधर्मिय शिवप्रेमी पुणेकर म्हणून दि. १३ डिसेंबर रोजी सकाळी १०.०० वा., डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मोर्चा खंडोजीबाबा चौकापासून टिळक चौक मार्गे लक्ष्मी रोडने बेलबाग चौक डाव्या हाताने लाल महाल येथे सभेने समारोप होणार आहे. यावेळी काळी फीत बांधून मोर्चाच्या माध्यमातून निषेध व्यक्त करणार आहे.

या संघटनांचा जाहीर पाठींबा व सहभाग

पुणे शहर बंदमध्ये छत्रपती उदयनराजे भोसले, मराठा क्रांती मोर्चा, मुस्लिम संघटना, मागासवर्गीय संघटना, मराठा सेवा संघ, मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड, गणेश मंडळ, व्यापारी संघटना, शैक्षणिक संघटना, मराठा संघटना, मार्केटयार्ड मधील सर्व संघटना, रिक्षा संघटना, तालिम संघ, माथाडी कामगार संघ, वकील संघटना, क्रीडा संघटना, बँक असोसिएशन, कामगार युनियन, राजकीय पक्षांमध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट), शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी, एम. आय. एम., जनता दल, वंचित बहुजन आघाडी त्याचप्रमाणे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संघटनांनी या बंदला पाठिंबा जाहिर केला आहे. तसेच या सर्व संघटना मोर्चात सहभागी होणार आहेत.

Back to top button