नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : गुजरातमध्ये भाजपला मिळालेले यश हे अपेक्षित आहे. त्यांच्या विजयाबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. मात्र आम आदमी पार्टीला इतर पक्षांची साथ मिळाली असती, तर भाजप आणि आम आदमीमध्ये कांटे की टक्कर पहायला मिळाली असती. मात्र तसे झाले नाही. कारण, भाजप आणि आपमध्ये साटेलोट असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केला.
दिल्लीमध्ये १५ वर्षे सत्ता असलेल्या भाजपसारख्या पक्षाकडून सत्ता खेचून आणणे हे सोपे नाही. मात्र आम आदमीने दिल्ली घेतली आणि गुजरात भाजपसाठी सोडल्याचा आरोप केला. हिमाचलमध्ये काँगेस चांगली लढत देत असल्याचे त्यांनी म्हटले.
दरम्यान, कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावर बोलताना त्यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर कडाडून हल्ला चढवला. काल राऊत यांनी एक ट्वीट केलं होतं. त्यामध्ये त्यांनी शिंदे सरकारला 'षंड' हा शब्द वापरला होता. त्यावरून दिवसभर राज्याच्या राजकारणात गदारोळ झाला. यावर बोलताना संजय राऊत यांनी कर्नाटक सरकारकडून महाराष्ट्रावर रोज शिंतोडे उडवले जात आहेत. जाणूनबुजून कुरापती काढल्या जात आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरतात. भाजपच्या नेत्यांकडून शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान केली जात आहेत. अशावेळी राज्य सरकारकडून कोणतीही कार्यवाही करण्यात येत नाही, तेव्हा अशा सरकारला कोणता शब्द वापरावा ते महाराष्ट्राचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि शंभूराज देसाई यांनी सांगावा आम्ही तो शब्द वापरतो असा पलटवार केला.
दरम्यान, राज्यपालांनी शिवरायांबद्दल अपशब्द वापरल्याने आज महाराष्ट्रात संतप्त वातावरण आहे. याबद्दल आम्ही त्यांना जाब विचारायला गेलो तर आम्हाला जेलमध्ये टाकायची भाषा केली जाते. महाराष्ट्रासाठी शिवरायांसाठी आम्ही तुरूंगात जायाला तयार आहोत अशी भूमीका राऊत यांनी मांडली.
राज्यपालांचा वादग्रस्त विधानाचा विषय विसरण्यासाठीच महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमाभागाचा विषय उकरून काढल्याचा आरोप यावेळी संजय राऊत यांनी केला. जर यांच्या अंगात खरं मराठी रक्त असतं तर त्यांनी मला साथ दिली असती म्हणत, माझ्यावर आरोप करणारे राज्यपालांवर कधी बोलणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
हेही वाचा :