उत्तर प्रदेशात हादरवून टाकणारे क्रौर्य; बलात्काराच्या गुन्ह्यातून भावाला वाचविण्यासाठी लेकीची हत्या

लखनौ; वृत्तसंस्था : उत्तर प्रदेशातील पिलीभीत जिल्ह्यातील माधोपूर गावात एक चक्रावून टाकणारी घटना घडली आहे. एका कटाचा भाग म्हणून 10 वर्षांच्या मुलीची पोटात चाकू भोसकून हत्या करण्यात आली. मुलीचे वडील, तिघे काका आणि आजोबांनीच ही हत्या केली.
मृत मुलीचा काका बलात्काराच्या एका गुन्ह्यात अडकलेला होता. मुलीच्या या हत्येच्या गुन्ह्यात बलात्कार पीडितेच्या पतीला अडकविण्यासाठी हा बनाव रचला. पीडितेवर या प्रकाराने दबाव येईल व बलात्काराचा गुन्हा ती मागे घेईल आणि आपला माणूस गुन्ह्यातून सहीसलामत सुटेल, इतक्या खालच्या स्तराचा हेतू या गुन्ह्यामागे या अवघ्या कुटुंबाचा होता. मृत मुलीची आई वगळता सारेच या कटात सहभागी होते.
मृत मुलीचे नाव अनम होते. तिची आतडी बाहेर आलेली होती. अनमच्या कुटुंबाने बलात्कार पीडितेच्या पतीवर आरोप केला. पोलिस तपासादरम्यान मात्र सारे सत्य उजेडात आले. अनमचा पिता अनिस, काका शादाब आणि आजोबा शहजादे यांनीच शकील यांना अडकविण्यासाठी तिची हत्या केल्याचे समोर आले. या सगळ्या कटात अनिस आणि शादाब यांचे सलीम आणि नसीम हे आणखी दोघे भाऊही सहभागी होते.
अशी केली हत्या
गावात जत्रा भरलेली होती. शादाबने सायंकाळी अनमला जत्रेला जाऊ म्हणून सांगितले. जत्रेत तिला हवे ते खाऊ घातले. जत्रेतच अनमच्या पित्याचे अनीसचेही दुकान होते. त्याने झोपेच्या गोळ्या खरेदी करून ठेवल्या होत्या. ज्यूसमध्ये अनमला त्या पाजण्यात आल्या. तिची शुद्ध हरपल्यानंतर तिला एका शेतात नेले आणि शादाबने तिच्या पोटात चाकू फिरविला. घरी परतल्यानंतर अनमला कुणीतरी किडनॅप केल्याची खोटी बातमी पसवली आणि शोधाशोध सुरू केली.