जी-20 च्या निमित्ताने भारताची बलस्थाने जगासमोर : पंतप्रधान नरेंद्र मोदी | पुढारी

जी-20 च्या निमित्ताने भारताची बलस्थाने जगासमोर : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली;  वृत्तसंस्था :  जी-20 चे यजमानपद ही भारताला मिळालेली मोठी संधी असून या निमित्ताने भारताची बलस्थाने जगासमोर सादर करता येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रमुख विरोधी पक्षनेत्यांसोबत झालेल्या बैठकीत सांगितले.

मंगळवारी नवी दिल्लीत पंतप्रधानांनी विरोधी पक्षीय नेत्यांची एक बैठक बोलावली होती. त्यात पंतप्रधानांनी या नेत्यांना जी-20 च्या यजमानपदाबद्दल व भारताच्या भूमिकेबाबत अवगत केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, जी-20 ही जगातील 20 शक्तिशाली अर्थव्यवस्थांची संघटना आहे. आज भारताबद्दल जगाला उत्सुकता आणि आकर्षण आहे. भारताला मिळालेली ही मोठी संधी आहे. वर्षभराच्या या यजमानपदामुळे भारताला आपली बलस्थाने जगासमोर सादर करता येतील. जी-20 च्या 200 हून अधिक बैठका होणार आहेत. त्या नेहमीच्या ठिकाणांऐवजी इतर छोट्या शहरांत जाणूनबुजून आयोजित करण्यात आल्या आहेत. कारण यामुळे या भागातील पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. जी-20चे विविध कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित करण्यासाठी सर्वच नेत्यांच्या सांघिक प्रयत्नांची आणि सहकार्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

या बैठकीला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक, तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन, माकप नेते सीताराम येचुरी, डी. राजा, तेलगु देसमचे नेते चंद्राबाबू नायडू, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची उपस्थिती होती.

दिलखुलास गप्पा, हास्यविनोद

या बैठकीसाठी आलेल्या नेत्यांसमवेत पंतप्रधान मोदी यांनी दिलखुलास गप्पा मारल्या, हास्यविनोद केले. राजकीय रणधुमाळीत कायम एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत वातावरण तापवणारे नेते मंगळवारी मात्र हलकेफुलके क्षण अनुभवताना दिसले.

.

Back to top button