सीमेवर नापाक कारवाया सुरूच

सीमेवर नापाक कारवाया सुरूच
Published on
Updated on

तरणतारण, वृत्तसंस्था : पाकिस्तानातील तस्करांनी पुन्हा एकदा भारतीय सीमेत ड्रोन पाठवले. ड्रोन पंजाबच्या सीमेवर आले आणि परत जाण्यात यशस्वीही झाले. तथापि, दक्ष असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी शोध मोहिमेदरम्यान ड्रोनने फेकलेल्या हेरॉइनची खेप जप्त केली. जप्त केलेल्या मालाची किंमत अंदाजे 17 कोटी रुपये आहे.

ड्रोनची ही हालचाल तरणतारणच्या सीमावर्ती कालिया गावात दिसली. सोमवारी रात्री उशिरा बीएसएफचे जवान सीमेवर असताना ड्रोनचा आवाज आला. त्या आवाजाच्या दिशेने गोळीबार करण्यात आला. मात्र, ड्रोन निघून जाण्यात यशस्वी झाले.

त्यावेळी किर्र अंधार असूनही बीएसएफच्या अधिकार्‍यांनी रात्रीच शोधमोहीम राबविण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी कालिया गावाच्या शेतात त्यांना पिवळ्या रंगाचे पाकीट सापडले. त्यावर दोरीचा हूक बनवण्यात आला होता, जेणेकरून ते ड्रोनमधून फेकणे सोपे जाईल. तपासाअंती पॅकेट उघडले असता त्यातून 2.470 किलो हेरॉईनची खेप जप्त करण्यात आली.

एका महिन्यात 7 ड्रोनला लक्ष्य केले

गेल्या महिनाभरात ड्रोनची बरीच हलचाल झाली आहे. पाकिस्तानच्या सीमेवरून दररोज ड्रोन भारतीय सीमेवर येत आहेत. बीएसएफने दिलेल्या माहितीनुसार, एका महिन्यात सुमारे 8 ड्रोन बीएसएफच्या गोळ्यांचे लक्ष्य बनले आहेत. असे असतानाही पाकिस्तानातील तस्कर हेरॉईनची खेप पाठवण्यासाठी ड्रोनचा वापर करत आहेत.

दहशतवादाविरुद्ध जगाने एकत्रित लढावे

न्यूयॉर्क : दहशतवाद हा जगासाठी सर्वात मोठा धोका आहे. दहशतवादाविरुद्ध त्यामुळेच जगाने एकत्रितपणे लढायला हवे, असे आवाहन संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताने पुन्हा एकदा केले. दहशतवादाविरोधात शून्य सहिष्णुता हे धोरण प्रत्येक देशाने अवलंबिल्याशिवाय या समस्येतून मार्ग काढता येणार नाही, असेही संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी स्पष्टपणे सांगितले.

26/11 मुंबई हल्ल्याचा उल्लेख करून त्या म्हणाल्या, की दहशतवाद्यांना कायद्यासमोर उभे करून शिक्षा ठोठावण्यात आपण यशस्वी होऊ तेव्हाच दहशतवादाविरुद्ध निर्णायक लढा जिंकता येईल. जगाच्या कुठल्याही एका भागात दहशतवाद असेल, तर तो त्या भागापुरता आहे, हे समजण्याची चूक जगाने करू नये, असा सल्लाही कंबोज यांनी दिला.

56 हिंदू कर्मचार्‍यांची यादी दहशतवाद्यांच्या वेबसाईटवर

श्रीनगर : वृत्तसंस्था : काश्मीरमध्ये विविध शासकीय विभागांत कार्यरत असलेल्या 56 हिंदू कर्मचार्‍यांची यादी फुटली असून, ती दहशतवाद्यांच्या हाती लागली आहे. ही यादी दहशतवाद्यांनी आपल्या वेबसाईटवर शेअर केली असून, तत्काळ काश्मीर सोडा, अन्यथा मरायला तयार राहा, असे या कर्मचार्‍यांना धमकावण्यात आले आहे.

याप्रकरणी भाजपने चौकशीची मागणी केली आहे. पंतप्रधान पुनर्वसन पॅकेजअंतर्गत 2010 पासून आजपावेतो सुमारे 5 हजार काश्मिरी हिंदूंची भरती विविध विभागांतून करण्यात आली आहे. काश्मीररमध्ये हिंदू आधीपासूनच दहशतवाद्यांच्या तसेच विघटनवाद्यांच्या निशाण्यावर आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news