Winter Session : महागाई, बेकारी, ईडब्ल्यूएस आरक्षणावर संसदेत चर्चा घ्या : विरोधी पक्षांची मागणी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : वाढती महागाई, बेकारी तसेच आर्थिक दुर्बलांसाठीच्या आरक्षणाच्या मुद्यावर संसदेत चर्चा घेतली जावी, अशी मागणी विरोधी पक्षांकडून आज (दि.६) सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनास (Winter Session) बुधवारपासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांनी ही मागणी केली.
(Winter Session) काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे, अधिररंजन चौधरी व नासिर हुसेन यांनी वाढती बेकारी, ईडब्ल्यूएस आरक्षण तसेच एका दिवसात निवडणूक आयुक्ताची नेमणूक केल्याचा मुद्दा उपस्थित करीत या विषयावर संसदेच्या उभय सदनात चर्चा घेण्याची मागणी केली. दुसरीकडे विरोधकांना लोकहिताचे मुद्दे उपस्थित करण्यास मुभा मिळावी, असे तृणमूलचे काँग्रेसचे नेते डेरेक ओ ब्रायन यांनी सांगितले.
सरकारकडून बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, व्यापार मंत्री पियुष गोयल यांच्यासह संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सहभाग घेतला. तर बहुतांश विरोधी पक्षांचे नेते या बैठकीस हजर होते. हिवाळी अधिवेशन 7 ते 29 डिसेंबर या कालावधीत चालणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे बुधवारी समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव यांना श्रध्दांजली वाहण्यात येईल. राज्यसभेचे कामकाज या वेळी पहिल्यांदाच उपराष्ट्रपती व पदसिध्द सभापती जगदीप धनकड यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
हेही वाचा :
- महाराष्ट्राच्या संयमाची परीक्षा बघू नका : शरद पवारांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना इशारा
- बेळगाव दौराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर पोलीस बंदोबस्तात वाढवला
- सीमाभागातील महामार्गांवर बंदोबस्त वाढविला : महाराष्ट्र पोलीसांना अलर्ट