

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) ने हुरुन इंडियाच्या देशातील सर्वात मौल्यवान ५०० कंपन्यांच्या यादीत पहिल्या १० महिला नियुक्त्यांमध्ये पहिले स्थान मिळवले आहे. कंपनीत सुमारे ३५% म्हणजेच २.१ लाख महिला कर्मचारी आहेत. यादीत समाविष्ट असलेल्या ५०० कंपन्यांपैकी ४१० कंपन्यांनी त्यांच्या संचालक मंडळावर महिलांना प्रतिनिधित्व दिले आहे.
या कंपन्यांनी गेल्या वर्षभरात ३.९ लाख नवीन नोकऱ्या दिल्या आहेत. यामध्ये आधीच ११.६ लाख महिला कार्यरत आहेत. आयटी क्षेत्रातील प्रमुख इन्फोसिस कंपनीमध्ये १, २४, ४९८, विप्रोमध्ये ८८,९४६ आणि एचसीएल टेक्नॉलॉजीजमध्ये ६२, ७८० महिला कार्यरत आहेत. या कंपन्यांमध्ये अनुक्रमे ४०%, ३६% आणि २८% महिला कर्मचारी काम करतात.
मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही १७.२५ लाख कोटी रुपयांच्या मूल्यासह देशातील सर्वांत मौल्यवान सूचीबद्ध कंपनी ठरली आहे. टीसीएस ही देशातील दुसरी आणि एचडीएफसी बँकही तिसरी सर्वात मौल्यवान सूचीबद्ध कंपनी म्हणून नोंदली
गेली आहे. या यादीत अदानी टोटल गॅस आणि अदानी एंटरप्रायझेस या गौतम अदानी यांच्या दोन कंपन्या आहेत.
सरकारी कंपन्यांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाने सर्वाधिक १४% वाढ नोंदवली यासोबतच पॉलिसी बाजार, पेटीएम, झोमॅटो आणि नायका सारख्या स्टार्टअप्सचे मूल्यांकनही कमालीचे खाली आले आहे. २.१९ लाख कोटी रुपयांचे बाजारपेठीय भांडवल असलेली लस निर्माता सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मौल्यवान असूचीबद्ध कंपनी ठरली आहे.
५०० सर्वात मौल्यवान कंपन्यांमध्ये संचालक मंडळाच्या १६% पदांवर महिला आहेत. या कंपन्यांमध्ये ६६४ महिलांचा संचालक म्हणून समावेश करण्यात आला आहे. अपोलो हॉस्पिटल एंटरप्रायझेसने सर्वाधिक सहा महिला संचालकांची नियुक्ती केली आहे, तर गोदरेज कंझ्युमर्स, पिरामल आणि इंडिया सिमेंट्सने प्रत्येकी पाच महिला संचालकांची नियुक्ती केली आहे