रेल्वे रूळातून उसळली पहार, अन् प्रवाशाच्या मानेतून आरपार | पुढारी

रेल्वे रूळातून उसळली पहार, अन् प्रवाशाच्या मानेतून आरपार

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : विंडो सीटचे आकर्षण बहुतांश प्रवाशांना असते. त्यावरून बर्‍याचदा प्रवाशांची भांडणेही होतात. हीच विंडो सीट कधी दगड लागून तर कधी आणखी कशाने प्रवाशांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याच्या घटनाही वरचेवर घडत असतात. दिल्लीहून कानपूरला जाणार्‍या नीलांचल एक्स्प्रेसमध्ये अशाच स्वरूपाची आतापर्यंतची सर्वात भयावह घटना घडली आहे. हरिकेश दुबे हा युवक या गाडीच्या बोगीत विंडो सीटवर बसलेला होता आणि रेल्वे रूळावर काम सुरू होते. वेगवान चाक वरून गेल्याने अचानक एक पहार (मोठी सळई) उसळली आणि विंडो तोडून हरिकेशच्या गळ्यातून आरपार झाली.

हरिकेशला हलण्याचीही संधी मिळाली नाही. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या आणि तो जागीच मरण पावला. डाबर-सोमना रेल्वे स्थानकांदरम्यानच्या प्रवासात घडलेल्या या घटनेने सहप्रवाशांचा थरकाप उडाला. हरिकेश उत्तर प्रदेशातील चांदा सुलतानपूर येथील रहिवासी होता. दुर्घटना घडली तेव्हा रेल्वेचा वेग ताशी 110 किमीच्या जवळपास होता. गाडी अलीगड रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर प्रवाशाचा मृतदेह जीआरपीच्या सुपूर्द करण्यात आला. हरिकेशच्या खिशातील ओळखपत्रावरून त्याची ओळख पटली.

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात कलम 304 नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रूळावर काम करणारे मजूर कोण होते, तेही तपासले जात आहे.

महिला बचावली

हरिकेश यांच्या बाजूला बसलेली एक महिला केवळ नशीब बलवत्तर म्हणून बचावली. पहार तिच्या मानेजवळून गेली. हरिकेश ओरडलाही असेल; पण रेल्वेच्या आवाजामुळे त्याचा आवाज आला नाही. मी त्याच्याकडे पाहिले तेव्हा लोखंडी रॉड त्याच्या मानेतून आरपार निघालेला होता. सीटवर सर्वत्र रक्तच रक्त होते, असे या महिलेने सांगितले.

Back to top button