पंतप्रधान नरेंद्र मोदी : भारत हेच आयुष्य असलेला भूमिपुत्र | पुढारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी : भारत हेच आयुष्य असलेला भूमिपुत्र

जगत प्रकाश नड्डा, राष्ट्रीय अध्यक्ष, भाजप

असामान्य वक्तृत्व शैली, जादुई व्यक्तिमत्त्व, त्वरित निर्णय घेण्याची क्षमता, दूरद़ृष्टी, शिस्तबद्ध जीवनशैली, साहसी वृत्ती, नेतृत्व कौशल्य, विनयशीलता ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सार्वजनिक आणि राजकीय जीवनातील अनुकरणीय मूल्ये आहेत. त्यांनी नेहमीच शिस्तबद्ध जीवनाचा अंगीकार केला. बाल स्वयंसेवकापासून ते देशाचे पंतप्रधानपद भूषविण्यापर्यंत त्यांनी अत्यंत शिस्तीचे आयुष्य व्यतीत केले आहे.

जगातील सर्वात लोकप्रिय लोकनेते, द्रष्टे पुरुष आणि देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिवस आहे. सुमारे 13 वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री आणि आता देशाचे पंतप्रधान म्हणून भारतीय शासनाच्या इतिहासात दीर्घकाळ कार्यरत आहेत. आपले पंतप्रधान जगातील असे एकमेव नेते आहेत, ज्यांनी सर्वसामान्य जनतेशी केवळ राजकीय संबंध जोडले नाहीत, तर भावनिक बंधही निर्माण केले आहेत. म्हणूनच जेव्हा सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय रेटिंग संस्थांच्या सर्वेक्षणात नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय लोकनेते म्हणून निवडले जातात, त्यावेळी आम्हा भारतीयांना अजिबात आश्चर्य वाटत नाही. कारण, ते प्रत्येक भारतीयाच्या हृदयात वसलेले आहेत.

नरेंद्र मोदी केवळ पंतप्रधान नाहीत, तर जनहितासाठी सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारे आणि लोकसहभागातून या प्रश्नांवर उपाययोजना करणारे समाजसुधारकदेखील आहेत. स्वच्छ भारत अभियान, बेटी बचाओ-बेटी पढाओ, जल संरक्षण आणि नमामि गंगे अभियानांचे यश याचीच साक्ष देणारे आहे. ते मुलांसाठी मार्गदर्शक आहेत आणि त्यांना ऊर्जा, बळ देणारे गुरूही.

‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमामुळे केवळ मुलांवरील तणाव कमी झाला नाही, तर त्यांच्यात आत्मविश्वासदेखील निर्माण झाला. ते स्वतःला प्रधानमंत्री नाही, तर ‘प्रधानसेवक’ म्हणवतात. कायमच ते समाजाला पुढे जाण्यासाठी आणि उत्तम आचार-विचार आणि संस्कार अंगी बाणवण्यासाठी प्रेरणा देतात, प्रोत्साहन देतात. राष्ट्रहितासाठी कितीही गुंतागुंतीचे काम असले, तरीही ते डगमगत नाहीत.

उलटपक्षी, त्या उद्दिष्टप्राप्तीसाठी ते आपले सर्वस्व पणाला लावतात. त्यांचे संपूर्ण सार्वजनिक आयुष्य निष्कलंक आणि स्वच्छ चरित्र आहे. त्यांचे आयुष्य म्हणजे एखाद्या राजर्षीसारखे आहे, जो सदैव, समाजाचे उत्थान आणि देशाच्या कल्याणाप्रती पूर्ण समर्पण वृत्तीने काम करत असतो.

भारतातून कलम 370 आणि 35 अ खरोखरच रद्द होऊ शकेल, अशी कल्पना तरी कधी देशातल्या लोकांनी केली असेल का? हे एक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी किती दशके जावी लागली. 5 ऑगस्ट 2019 रोजी नरेंद्र मोदी यांच्या द़ृढ इच्छाशक्तीमुळे कलम 370 संपले आणि खर्‍या अर्थाने देशात ‘एक देश, एक संविधान’ या संकल्पनेची स्थापना झाली. जम्मू-काश्मीर भारताचे अविभाज्य घटक राज्य बनले. त्याचप्रमाणे दहशतवादावर देखील देशातील सरकारे कुठलेच निर्णायक पाऊल उचलत नव्हती.

सर्वसाधारण जनतेलाही असे वाटत होते, की सरकार केवळ अशा दहशतवादी हल्ल्यांचा केवळ तीव्र शब्दांत निषेध करण्यापुरतेच उरले आहे का? त्यापलीकडे सरकारचे काही कर्तव्य नाही का? मात्र, सर्जिकल आणि हवाई हल्ले यातून नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जगाला कठोर संदेश देत सांगितले की, भारत आता बदलला आहे. आपल्या सीमा आणि आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आता भारत कुठलेही पाऊल उचलू शकतो. गेल्या सात वर्षांत, देशात दहशतवादी घटनांमध्ये घट झाली आहे आणि देश शांतता, तसेच समृद्धीच्या मार्गाने पुढे वाटचाल करत आहे.

कोरोना काळात त्यांनी दिलेल्या प्रत्येक सूचनेची जनतेने शंभर टक्के अंमलबजावणी केली. परिणामी, आपल्याला कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात योग्य वेळी मदत झाली. त्यांच्या एका आवाहनामुळे सुस्थितीतील लोकांनी त्यांचे अनुदान नाकारले. त्यांच्या एका आवाहनाला प्रतिसाद देऊन देशाच्या जनतेने देशसेवेसाठी पीएम केअर्स निधीला भरभरून मदत केली. त्यांच्या एका आवाहनामुळे देशभरातील सर्व संस्था कोव्हिड पीडितांच्या मदतीसाठी कार्यरत झाल्या.

त्यांच्या एका आवाहनाला प्रतिसाद देत ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ आंदोलनाने समाजात क्रांती घडवून आणली. मोदींच्या आणखी एका आवाहनाने वैज्ञानिकांना आपल्या देशातच कोव्हिडची लस बनविण्याचा प्रेरक मंत्र दिला आणि त्यांच्या एका आवाहनाने देशवासीयांच्या मनातील लसीकरणाविषयीचा सगळा संकोच, सगळ्या शंका देखील दूर केल्या.

2014 पूर्वी राजकीय पक्षांच्या निवडणूक जाहीरनाम्यांना जनता केवळ राजकीय पक्षांचे मते गोळा करण्यासाठीचे साधन समजत असे. मात्र, नरेंद्र मोदी यांनी देशाचे पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्यात लिहिलेल्या प्रत्येक घोषणेला सरकारचे कर्तव्य आणि उद्दिष्ट बनवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विचारशक्तीचा दर्जा उंचावला आहे. त्यांनी देशाच्या राजकीय कार्यसंस्कृतीत चांगले बदल घडवून आणले आहेत.

यापूर्वी, राजकारणाला जातीयवाद, घराणेशाही, तसेच आश्वासन संस्कृतीसारख्या दुष्ट प्रवृत्तींनी जखडले होते आणि त्यामुळे ‘राजकारण’ हा शब्दच कलंकित झाला होता. नरेंद्र मोदी यांनी आता जातीयवाद, घराणेशाही, तसेच आश्वासन संस्कृतीच्या राजकारणाच्या जागी विकासवादाचे राजकारण प्रचलित केले आहे आणि त्यामुळे संपूर्ण देशातील राजकारणाची पद्धत बदलून गेली आहे.

50-50 वर्षे रखडलेल्या योजना वेगाने पूर्ण करण्यासाठी आणि सरकारी अधिकार्‍यांचे उत्तरदायित्व निश्चित करून भ्रष्टाचारावर नियंत्रण आणण्यासाठी पंतप्रधानांनी सक्रिय प्रशासन आणि वेळेवर अंमलबजावणी अर्थात ‘प्रगती’ची सुरुवात केली आहे. या उपक्रमामुळे केवळ प्रलंबित योजनाच पूर्ण झाल्या असे नव्हे, तर सतत आढावा घेण्याच्या पद्धतीमुळे योजनेच्या मार्गात येणारे अडथळेदेखील दूर झाले. प्रत्येक महिन्याच्या चौथ्या बुधवारी पंतप्रधान ‘प्रगती’ची बैठक घेतात आणि निवडक योजनांचा आढावा घेतात. यामुळे योजनांना होणारा विलंब टळला असून, प्रकल्पाच्या खर्चात होणार्‍या अवाजवी वाढीलादेखील लगाम लागला आहे.

असामान्य वक्तृत्व शैली, जादुई व्यक्तिमत्त्व, ईमानदार प्रतिमा, त्वरित निर्णय घेण्याची क्षमता, सुस्पष्ट दूरद़ृष्टी, शिस्तबद्ध जीवनशैली, साहसी वृत्ती, नेतृत्व कौशल्य, विनयशीलता आणि देशाच्या नागरिकांसाठी चांगल्या गोष्टी करण्याची उर्मी ही आपल्या पंतप्रधानांच्या सार्वजनिक आणि राजकीय जीवनातील अनुकरणीय मूल्ये आहेत. त्यांनी नेहमीच शिस्तबद्ध जीवनाचा अंगीकार केला आहे. बाल स्वयंसेवक बनण्यापासून ते देशाचे पंतप्रधानपद भूषविण्यापर्यंत त्यांनी अत्यंत शिस्तीचे आयुष्य व्यतीत केले आहे.

कोणताही निर्णय त्वरित घेण्याची त्यांची खासियत आहे. म्हणूनच ते इतर नेत्यांपेक्षा वेगळे आहेत. नरेंद्र मोदीजींच्या शरीराचा प्रत्येक कण आणि जीवनाचा प्रत्येक क्षण देशातील खेडे, गरीब, शेतकरी, दलित, पीडित, शोषित, वंचित, तरुण आणि महिलांच्या कल्याणासाठी समर्पित आहे. कोरोना कालावधीत सलग दुसर्‍या वर्षी मार्च ते नोव्हेंबर या कालावधीत देशातील 80 कोटी लोकांना आवश्यक अन्नधान्य मोफत पुरवले जात आहे.

आयुष्मान भारतअंतर्गत देशातील 55 कोटी लोकांना वर्षाला पाच लाख रुपयांचा मोफत आरोग्य विमा मिळत आहे. जीवन विमा आणि अपघात विमा 330 आणि 12 रुपयांच्या प्रीमियमवर उपलब्ध आहे. देशातील सुमारे 12 कोटी शेतकरी, ज्यापैकी सुमारे 80 टक्के लहान आणि अल्पभूधारक शेतकरी आहेत, त्यांना किसान सन्मान निधीच्या रूपात दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळत आहे.

देशातील प्रत्येक गरिबाला घर मिळत आहे आणि त्या घरात पाणी, वीज, गॅस सिलिंडर आणि शौचालये दिली जात आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली जगातील सर्वात मोठी आणि सर्वाधिक वेगवान लसीकरण मोहीम भारतात सुरू आहे, ज्याचे संपूर्ण जगात कौतुक होत आहे. त्यांची विचारसरणी नेहमीच सर्जनशील असते. त्यांच्या यशाचे एक मोठे गमक म्हणजे ते कठोर परिश्रम करतात आणि सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्यावर विश्वास ठेवतात.

Back to top button