

पुढारी ऑनलाईन डेस्क : समान नागरी कायदा हा राष्ट्रीय मुद्दा आहे. हा कायदा देशातील जास्तीत-जास्त राज्यांमध्ये लागू केला पाहिजे, असे मत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी व्यक्त केली. वृत्तसंस्था 'पीटीआय'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ( BJP chief JP Nadda )
मुलाखतीवेळी एका प्रश्नाला उत्तर देताना जेपी नड्डा म्हणाले की, "आमचा पक्ष सातत्याने समान नागरी कायदा या मुद्यावर चर्चा करत आहे. भाजपसाठी हा एक राष्ट्रीय मुद्दा आहे. आम्ही या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी कटीबद्ध आहोत. देशातील साधनसामुग्रीवर सर्वांचा समान हक्क आहे. त्यामुळे समान नागरी कायद्याचे स्वागत हे एक़ योग्य पाऊल आहे."
राष्ट्रविरोधी व समाजविरोधी कृत्य रोखण्याची जबाबदारी ही राज्य सरकारांची आहे. शरीरातील प्रतिकार शक्ती ज्या पद्धतीने घातक विषाणूंपासून शरीराचे संरक्षण करते. त्याचप्रमाणे राष्ट्रविरोधी काम करणार्यांवर लक्ष ठेवण्याचे काम राज्य सरकारचे आहे, असेही ते म्हणाले.
गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत भाजपने मुस्लिम उमेदवाराला निवडणूक रिंगणात का उतरवले नाही, या प्रश्नावर नड्डा म्हणाले, विधानसभा निवडणुकीचे तिकीट हे निवडणूक उमेदवार जिंकणार का, याचा विचार करुनच दिले जाते. भारतीय जनता पक्षाने स्वर्गीय डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती निवडणुकीत समर्थन दिले होते. त्याचबरोबर मोदी सरकारने मुस्लिम राज्यपालांचीही नियुक्ती केली आहे. सबका साथ, सबका विकास या विचाराचे आम्ही पालन करतो.
गुजरात विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी व काँग्रेस यांनी कोणताही विचार न करता अनेक बाबी मोफत देण्याच्या घोषणा करत आहे. भाजप गरीब आणि गरजु लोकांच्या सक्षमीकरणासाठी कटीबद्ध आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.