भारतीय प्रजासत्ताक दिनाला इजिप्तच्या राष्ट्रपतींना निमंत्रण

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल सिसी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी २०२३ रोजी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अल-सिसी यांना औपचारिक निमंत्रण पाठवले आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी १६ ऑक्टोबर रोजी त्यांना हे निमंत्रण सुपूर्द केले, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
या वर्षी दोन्ही देशांनी राजकीय संबंधांचा ७५ वा वर्धापन दिन साजरा केला आहे. गेल्या महिन्यात, भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी इजिप्तच्या दौऱ्यात राष्ट्राध्यक्ष अल-सिसी यांची भेट घेतली होती. परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, २०२२-२३ मध्ये भारताच्या G-20 च्या अध्यक्षतेदरम्यान इजिप्तला अतिथी देश म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. भारत आणि इजिप्तमध्ये सभ्यता आणि जनतेच्या संबंधांवर आधारित मैत्रीपूर्ण संबंध आहेत.
१९५० पासून मैत्रीपूर्ण देशांचे नेते प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सहभागी होत आहेत. १९५० मध्ये इंडोनेशियाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष सुकर्णो यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. १९५२, १९५३ आणि १९६६ मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला कोणताही परदेशी नेता प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेला नाही.
२०२१ मध्ये तत्कालीन ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. परंतु ब्रिटनमध्ये कोविड-19 च्या वाढत्या प्रकरणांमुळे त्यांनी आपला दौरा रद्द केला होता. या वर्षी भारताने मध्य आशियाईतील ५ नेत्यांना प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी आमंत्रित केले होते. त्याचवेळी, २०१८ मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात, दक्षिण-पूर्व आशियाई राष्ट्रांच्या संघटनेच्या (ASEAN) सर्व १० देशांचे नेते प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये उपस्थित होते. २०२० मध्ये, ब्राझीलचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनारो हे प्रमुख पाहुणे होते.
हेही वाचलंत का ?
- IND vs NZ : भारतविरुद्ध न्यूझीलंड दुसरा वनडे सामना पावसामुळे रद्द!
- Urfi Javed: उर्फी जावेदचे चेतन भगत यांना उत्तर, “खापर स्त्रियांवर फोडून तुम्हीच…”
- उद्धव ठाकरेंच्या पायाखालची वाळू सरकलीय : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे