

गुवाहाटी ; पुढारी ऑनलाईन- आमच्या सरकारकडून जनतेच्या कामांना प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे जनता आमच्या सरकारवर समाधानी आहे. त्यामुळे विरोधी गटाकडून सरकारवर फक्त टीका होत आहे. आम्ही केलेल्या कामामुळे जनतेतून आम्हाला पाठिंबा मिळत असल्याचे पाहून उध्दव ठाकरे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गुवाहाटी येथे माध्यमांशी बोलताना केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या समर्थक आमदारांसह शनिवार, २६ नोव्हेंबर रोजी गुवाहाटीतील कामख्या देवीच्या दर्शनासाठी गेले होते. आज (दि. २७) मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह सर्व आमदार, खासदार पुन्हा मुंबईकडे रवाना झाले. तत्पूर्वी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, " आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आमचे जंगी स्वागत केले. त्यांनी देवीच्या दर्शनासाठी आम्हाला आमंत्रण दिले होते. आमचे देवीचे दर्शन झाले. महाराष्ट्राच्या जनतेला सुखात ठेव अशी मागणी आम्ही देवीच्या चरणी केली. या ठिकाणच्या लोकांकडून आम्हाला खूप प्रेम मिळाले".
आसामच्या मुख्यमंत्र्यांसोबत आपली चर्चा झाली. यावेळी आसाममध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी त्यांनी तात्काळ मंजुरी दिली. महाराष्ट्रातून कामाख्या देवीच्या दर्शनसाठी येणाऱ्या मराठी भाविकांसाठी त्याचा उपयोग होईल असेही शिंदे यांनी सांगितले. आसामच्या मुख्यमंत्र्यांनीही महाराष्ट्रात आसाम भवन उभारण्याची मागणी केली आहे. त्यासाठी नवी मुंबईत त्यांना जागा देण्याचा विचार असून, त्यांना तसे पत्र पाठवण्यास सांगितले आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
हेही वाचा :