कोश्यारींना राज्यपालपदावरून हटविण्याच्या हालचाली

दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटल्याने राजकीय वातावरण तापले आहे. राज्यातील भाजपचे नेतेही अडचणीत आले आहेत. याची दखल घेत भाजप पक्षश्रेष्ठींनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना तातडीने दिल्लीला पाचारण केले असल्याचे समजते. ते 24 आणि 25 नोव्हेंबरला दिल्लीत जाणार आहेत. त्यांच्या या भेटीत भाजप पक्षश्रेष्ठी कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत आहेत. छत्रपती घराण्याचे वंशज आणि महाविकास आघाडीने एकमुखाने राज्यपाल कोश्यारी यांना राज्यपालपदावरून हटविण्याची मागणी लावून धरली आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यपाल कोश्यारी 24 आणि 25 तारखेला दिल्लीला जाणार आहेत. यावेळी ते नेमके कोणाला भेटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच भाजपचे केंद्रीय नेतृत्व कोश्यारी यांना पदमुक्त करण्याच्या द़ृष्टीने काही पावले टाकणार का, याविषयीदेखील चर्चा सुरू झाली आहे.
भगतसिंह कोश्यारी यांचा दिल्ली दौरा नियोजित असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, भाजपच्या नेत्यांनी कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यातील भाजप नेत्यांच्या तक्रारीनंतर त्यांना दिल्लीला बोलावल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आता येत्या दोन दिवसांमध्ये काय घडणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.
कोश्यारी यांनी औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या डी.लिट. पदवी प्रदान सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले होते. ‘आम्ही जेव्हा शिकत होतो, तेव्हा आम्हाला विचारत होते, तुमचा आवडता हिरो कोण आहे. आम्ही त्यावेळी सुभाषचंद्र बोस, नेहरू, गांधी जे चांगले वाटत होते त्यांची नावे सांगत होतो; पण आता महाराष्ट्रात तुम्हाला नवे हिरो मिळतील, शिवाजी तर जुने आदर्श झाले आहेत. नवीन काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत हिरो इथेच मिळतील,’ असे वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी केल्याने राज्यात संताप व्यक्त करण्यात आला. त्यावर भाजपच्या नेत्यांनीही आपली नाराजी व्यक्त केली होती. तसेच पक्षश्रेष्ठींनादेखील तक्रारी केल्या असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर राज्यपाल कोश्यारी यांना राज्यपालपदावरून हटविण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याची चर्चा भाजपमध्ये आहे.