रोजगार मेळावा : एका वर्षात ७५ हजार रोजगार देण्याचा शिंदे-फडणवीस सरकारचा संकल्प, पुढील आठवड्यात १८ हजार ५०० पोलिस पदांची भरती | पुढारी

रोजगार मेळावा : एका वर्षात ७५ हजार रोजगार देण्याचा शिंदे-फडणवीस सरकारचा संकल्प, पुढील आठवड्यात १८ हजार ५०० पोलिस पदांची भरती

मुंबई : एका वर्षात ७५ हजार रोजगार देण्याचा संकल्प शिंदे-फडणवीस सरकारने केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे आयोजित राज्यस्तरीय रोजगार मेळाव्यात पहिल्या टप्प्यातील उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. या रोजगार मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वार संबोधित केले. ”धनत्रयोदशीच्या दिवशी केंद्राने 10 लाख नोकऱ्या देण्याची मोहीम सुरू केली. त्यावेळी आपण सांगितले की, येत्या काही दिवसांत अनेक राज्य सरकारे रोजगार मेळाव्याचे आयोजन करतील. आज महाराष्ट्रात अनेक तरुणांना नियुक्तीपत्रे दिली जात आहेत. मी त्यांचे अभिनंदन करतो,” असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मागच्या काळात अनेक घोटाळे झालेत. त्यामुळे कोणत्याही कोर्ट केसेस न होता, पारदर्शक पद्धतीने नोकर भरती व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुढील आठवड्यात १८ हजार ५०० पोलिस पदांची तर महिन्याभरात १० हजार ५०० पदांची भरती ग्रामविकास विभागात काढली जाईल.

ते पुढे म्हणाले की, सर्व विभागांनी पदे चिन्हांकीत केली आहेत. मागील काळात अनेक घोटाळे समोर आले आहेत. त्यामुळे शासकिय नोकऱ्या पारदर्शक पद्रधतीने मिळाल्या पाहिजेत. भरतीसाठी दोन एजन्सी नेमल्या आहेत. त्यामुळे लवकरच परिक्षा घेण्यात येणार असून वर्षभरात ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. कोणत्याही कोर्ट केसेस न होता पारदर्शक पद्धतीने भरती व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. छोट्या छोट्या गोष्टींसाठी कोर्टात जावून भरतीला थांबवू नका, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

शासकीय नोकरी ही सेवा आहे. सामन्य माणसाला सरकारी अधिकाऱ्याकडे जाताना भीती वाटणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. शासकिय कर्मचारी म्हणून भ्रष्ठाचारापासून दूर राहता आले पाहिजे. सर्वांनी पारदर्शक काम करा, असे आवाहन फडणवीस यांनी नियुक्तीपत्रे देण्यात आलेल्या तरूणांना केले.

तसेच कौशल्यविकास विभागाकडून प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावे घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी बोलताना मुख्यंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, वर्षभरात ७५ हजार नोकऱ्या देण्यात येणार असुन पहिल्या टप्यात २००० पेक्षा जास्त नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. हा पहिला टप्पा आहे. भरती प्रक्रिया पारदर्शक व वेगाने झाली पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आमच्या सरकारमध्ये पारदर्शकता आहे. १८ महिन्यांनंतर कॅबिनेट सबकमिटीची बैठक झाली. यामध्ये १० उद्योजकांना २५ हजार ३६८ कोटी गुंतवणुकीला मंजूरी दिली आहे. यामध्ये ८ हजार ५०० थेट रोजगार मिळतील.


हेही वाचा :

Back to top button