लग्नास नकार दिल्याने प्रेयसीची हत्या; शरीराचे तुकडे करून विहिरीत टाकल्याची घटना | पुढारी

लग्नास नकार दिल्याने प्रेयसीची हत्या; शरीराचे तुकडे करून विहिरीत टाकल्याची घटना

लखनौ; वृत्तसंस्था :  लग्नाला नकार दिला म्हणून उत्तर प्रदेशातील आझमगड येथे प्रियकराने प्रेयसीची निर्घृण हत्या करून तिचे तुकडे एका विहिरीत टाकल्याची सनसनाटी घटना उजेडात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी प्रिन्स यादव याच्यासह नऊजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आराधना प्रजापती वय (वय २२) असे पीडितेचे नाव आहे. हत्येची घटना ९ नोव्हेंबर रोजी घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

प्रिन्सने आपल्या दुचाकीवरून आराधनाला पश्चिमपट्टी गावातील मंदिरात नेले आणि नंतर तीक्ष्ण हत्याराने तिचा खून केला. त्यानंतर तिच्या शरीराचे पाच तुकडे करून त्याने  ते जवळच्या विहिरीत टाकले. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून प्रिन्सला बेड्या ठोकल्या. या प्रकरणातील अन्य आठ आरोपी फरारी झाले आहेत.  प्रिन्स याला त्याचे आई-वडील, बहीण, मामा, मामी, मामेभाऊ आदींनी साथ दिल्याचे उघड झाले आहे.

प्रिन्सचा पोलिसांवर गोळीबार

पोलिसांनी १९ नोव्हेंबर रोजी प्रिन्स याला ताब्यात घेतले आणि आराधनाच्या हत्येसाठी वापरलेली शस्त्रे शोधण्यासाठी ते त्याला घटनास्थळी घेऊन गेले. त्यावेळी पोलिस पुरावे जमा करण्याच्या गडबडीत असल्याची संधी साधून प्रिन्स याने तेथील शेतात लपवलेल्या गावठी पिस्तूलमधून पोलिसांवर गोळीबार केला. लगेचच पोलिसांनी स्वरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात प्रिन्स जखमी झाला.

Back to top button