Anand Rekhi : छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख असलेल्या ठिकाणांची नावे बदला : आनंद रेखी | पुढारी

Anand Rekhi : छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख असलेल्या ठिकाणांची नावे बदला : आनंद रेखी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा एकेरी उल्लेख असलेल्या ठिकाणांची नावे बदलण्याची मागणी भाजप नेते आनंद रेखी (Anand Rekhi) यांनी आज ( दि. २१ ) केली. राजधानी दिल्लीतील मेट्रो- रेल्वे स्टेशन, स्टेडियम, पार्कचे नाव बदलण्यात यावीत. यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेण्यात आला नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रेखी यांनी दिला आहे.

महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज तमाम हिंदुस्तानासाठी वंदनीय, पूज्यनीय आहेत. महाराजांची गौरवगाथा आजही असंख्यांना प्रेरणा देणारी आहे. परंतु, राजधानी दिल्लीत मेट्रो- रेल्वे स्टेशन, स्टेडियम तसेच पार्क या ठिकाणांना छत्रपतींच्या नावाचा एकेरी उल्लेख आहे. ही बाब मन दुखावणारी असून, महाराजांवर असलेल्या श्रद्धेचा अपमान करणारी आहे. त्यामुळे या सर्व ठिकाणांची नावे बदलून ती छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, छत्रपती शिवाजी महाराज मेट्रो स्टेशन, छत्रपती शिवाजी महाराज ब्रीज स्टेशन आणि छत्रपती शिवाजी महाराज पार्क असे करावीत, अशी मागणी रेखी (Anand Rekhi) यांनी केली आहे.

यासंदर्भात लवकरच केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (डीएमआरसी) तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटी घेणार असल्याचे रेखी यांनी सांगितले. राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याही निर्दशनात ही बाब आणून देवू, असे ते म्हणाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या मागणीला समर्थन देत या ठिकाणांवरील महाराजांचा एकेरी उल्लेख असलेले नाव हटवण्याच्या अनुषंगाने पाठपुरावा करण्याचे आवाहन रेखी यांनी केले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button