काँग्रेस गुजरातविरोधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी | पुढारी

काँग्रेस गुजरातविरोधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी

राजकोट; वृत्तसंस्था :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात निवडणुकीच्या प्रचाराला दणक्यात सुरुवात करत काँग्रेसला निशाण्यावर घेतले आहे. काँग्रेस गुजरातविरोधी असून नर्मदा प्रकल्पाला विरोध करणार्‍या महिलेसोबत पदयात्रा करणार्‍या नेत्यांना गुजरातच्या अपमानाचा जाब विचारा, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. रविवारी राजकोट जिल्ह्यातील धोराजी येथे जाहीर सभेत ते बोलत होते.

रविवारच्या सभेत पंतप्रधान मोदी यांनी राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा आणि काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला. त्यात त्यांनी काँग्रेस गुजरातविरोधी असल्याची भ्ाूमिका मांडत कठोर शब्दांत टीका केली. दोनच दिवसांपूर्वी महाराष्ट्रात शेगाव येथे नर्मदा आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या होत्या. सभेत नेमक्या त्याच विषयाला हात घालत मोदी म्हणाले की, नर्मदा प्रकल्पाची पायाभरणी पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केली. आपल्या कारकिर्दीत या परियोजनेचे उद्घाटन झाले. कच्छ आणि काठियावाड या भागांना पाणी देणारी ही एकमेव योजना असताना या भागातील नागरिकांना ते पाणी मिळू नये, यासाठी जंगजंग पछाडले गेले. आंदोलने केली गेली, न्यायालयात प्रकरण नेले गेले. या प्रकारात गुजरातची एवढी बदनामी झाली की, जागतिक बँकेने या प्रकल्पाला निधीचा पुढचा हप्ता द्यायला नकार दिला. असे आंदोलन करणार्‍या महिलेसोबत काँग्रेसचे नेते खांद्याला खांदा लावून पदयात्रा करतात. या नेत्यांना गुजरातच्या अपमानाचा जाब विचारा, असे आवाहन त्यांनी केले.

नड्डा यांचेही टीकास्त्र

राहुल गांधी यांच्यावर भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही टीकास्त्र सोडले आहे. गुजरातच्या तहानलेल्या नागरिकांना पाणी द्यायला विरोध करणारे लोक पदयात्रेत सहभागी होत असतील, तर राहुल आणि काँग्रेसची वृत्ती त्यातून दिसते. काँग्रेस हा गुजरातविरोधी, सौराष्ट्रविरोधी, नर्मदाविरोधी पक्ष आहे, असे ते म्हणाले.

Back to top button