निवडणूक आयुक्त म्हणून अरुण गोयल यांची नियुक्ती | पुढारी

निवडणूक आयुक्त म्हणून अरुण गोयल यांची नियुक्ती

नवी दिल्ली : सेवानिवृत्त सनदी अधिकारी अरुण गोयल यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. ते लवकरच पदाची सूत्रे स्वीकारतील. माजी मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र मे महिन्यात सेवानिवृत्त झाल्यानंतर राजीवकुमार यांच्याकडे मुख्य निवडणूक आयुक्तपदाची सूत्रे सोपवण्यात आली.

निवडणूक आयोगात एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन आयुक्त अशी तीन जणांची नियुक्ती असते. पण चंद्र यांच्या निवृत्तीनंतर राजीवकुमार आणि अनुपचंद्र पांडेय या दोघांकडेच आयोगाची जबाबदारी आली. आता गुजरात निवडणुकीच्या आधीच गोयल यांची राष्ट्रपतींनी नियुक्ती केली. आता निवडणूक आयोगाचा कोरम पूर्ण झाला असून नागालँड, मेघालय, त्रिपुरा आणि कर्नाटक या चार राज्यांच्या निवडणुकांची जबाबदारी पूर्ण आयोग हाताळेल. गोयल हे या आधी अवजड उद्योग आणि सांस्कृतिक खात्यांमध्ये सचिव राहिलेले आहेत.

Back to top button